पंधरा दिवसात जमा होणार पीक नुकसानीची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:07+5:30
शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच मदतीची रक्कम ४८ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही तर बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यात सन २०१७ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून १ कोटी ६७ लाख २२ हजार ४४९ रुपयांची एचडीएफसी बँक शाखा केशोरीमार्फत जमा केली होती. परंतु २ वर्षाचा काळ लोटूनही सदर बँक शाखेनी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम जमा केली नव्हती.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन देऊन ४८ तासाची मुदत दिली होती. अन्यथा एचडीएफसी बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.
त्या इशाऱ्याची दखल घेत जाहीर झालेल्या नुकसानीची रक्कम येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची हमी नायब तहसीलदार गेडाम यांच्यासमोर बँक व्यवस्थापक सचिन लडके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना लेखी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात जमा होणार आहे.
सन २०१७ मध्ये तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.
नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करुन तत्कालीन शासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून १ कोटी ६७ लाख २२ हजार ४४९ रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या अनियमिततेमुळे २ वर्षांचा कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच मदतीची रक्कम ४८ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही तर बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत एचडीएफसी बँक शाखा केशोरीचे व्यवस्थापक सचिन लडके यांनी येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल असे लेखी हमीपत्र दिले.
या वेळी शिवसेना जिल्हा सचिव संजय पवार, तालुका प्रमुख अजय पालीवाल, तालुका संघटक प्रमुख चेतन दहीकर, युवा सेना तालुका प्रमुख अभिजित मशिद, ज्ञानदेव कापगते, शुशील गहाणे, विनोद भजणे, कैलास चुन्ने, नाना शेंडे, सुधाकर बोरकर, गुलाब गोटेफोडे, राजू कोलाम, विनोद गहाणे, राजू गहाणे उपस्थित होते.