पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:20 AM2021-06-28T04:20:35+5:302021-06-28T04:20:35+5:30

गोंदिया : भारत सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुटीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग ...

The amount of nutritious food goes directly into the student's account | पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात

पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात

Next

गोंदिया : भारत सरकारच्या निर्देशानुसार २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळ्याच्या सुटीच्या काळातील पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला आहे. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही; ज्यांचे आहे त्या खात्यात व्यवहार नसल्याने दंड होऊ शकतो. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीवर शंका उपस्थित केली जात आहे.

या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांचे खाते नसल्यास बँक खाते उघडावे. ते आधारशी लिंक करावे,असे आदेश शिक्षण संचालनालयाने शाळांना दिले. आधार कार्ड लिंक करुन १ जुलै २०२१ पर्यंत बँक खात्याची सर्व माहिती अद्ययावत करायची आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह अन्य शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करुन शिक्षकांनी खाते उघडले; मात्र खात्यात किमान सहा महिन्यांतून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले. किमान शिल्लक नसल्याने दंड होतो. त्यामुळे नवीन रक्कम जमा होताच सर्वप्रथम दंड आकारल्याने लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. उन्हाळी सुटीच्या दोन महिन्यांतील अंदाजित ३५ दिवस गृहीत धरल्यास पहिली ते पाचवीसाठी दरदिवशी ४.४८ रुपयाप्रमाणे एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि सहा ते आठसाठी दर दिवशी ६.७१ रुपये प्रमाणे एकूण २३४ रुपये ८५ पैसे जमा होतील. एवढ्या कमी रकमेसाठी बँक खाते सुरु ठेवणे गरीब विद्यार्थ्यांसाठी अवघड होणार असल्याचे मत शिक्षक, मुख्याध्यापकांनी मांडले.

कोट.....

शिक्षकांना वेठीस धरणे चुकीचे

पोषण आहाराची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. वयाच्या अटीमुळे काही विद्यार्थ्यांचे खाते उघडता येत नाही; तर काहींचे व्यवहाराअभावी बंद आहे. अनेक खात्यांना आधार कार्ड लिंक नाही. यासाठी शिक्षकांना वेठीस धरण्यात येणार असून हे चुकीचे आहे.

- किशोर डोंगरवार, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती गोंदिया.

Web Title: The amount of nutritious food goes directly into the student's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.