धनादेशात खोडतोड करुन काढली रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:11 AM2018-09-22T00:11:03+5:302018-09-22T00:12:11+5:30
सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : सात हजार रुपयांच्या धनादेशावर खोडतोड करुन १ लाख सात हजार रुपये विड्राल करण्यात आल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील काचेवानी ग्रामपंचायमध्ये उघडकीस आला आहे. यात तत्कालीन ग्रामसेवकाचा सहभाग असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार काचेवानी ग्रामपंचायतच्या तत्कालीन ग्रामसेवक हसंराज वासनिक व तत्कालीन सरपंच प्रमिला रहांगडाले यांनी तिरोडा येथील युनियन बँकेत सामान्य फंडाचे बोगस खाते उघडले. खाते क्र. ५९४३०२०१०००५०५१ असून यातून १५ एप्रिल २०१४ ला तत्कालीन सरपंच रहांगडाले व ग्रामसेवक वासनिक यांच्या संयुक्त सहीने १ लाख ७ हजार रुपये रुपये विड्राल करण्यात आले.
धनादेश क्र. ००९२६४ चे अवलोकन केल्यास केवळ ७००० रुपये काढायचे होते, पण याच धनादेशामध्ये सुरुवातीला खोडतोड करुन १ लाख ७ हजार रुपये करुन ग्रामसेवक वासनिक यांनी काढून तत्कालीन सरपंच यांची फसवणूक केल्याचे बँकेतून घेतलेल्या विड्राल धनादेशाव्दारे काढल्याचे स्पष्ट होते. युनियन बँक शाखा तिरोडा येथून विड्राल केलेल्या धनादेशाच्या प्रकरणी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनियन बँकेचे शाखाधिकारी आणि कॅशियर यांनी धनादेशावर खोडतोड असताना मोठ्या रकमेचा धनादेश विड्राल कसा दिला. यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धनादेश खोडतोड आणि रकमेत वाढ केल्याप्रकरणी पोलीस तक्रार करुन फसवणूक व धनादेश अनादर प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच युनियन बँक अधिकाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.दरम्यान वासनिक यांच्या कार्यकाळातील प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बोगस खाते व अपहार रकमेची माहिती मिळणार
काचेवानी ग्रामपंचायतमध्ये २०१० ते २०१५-१६ पर्यंत कमीत कमी ५० लाख रुपयांचा अपहार केल्याची माहिती आहे. मुंडीकोटा येथील बँक सहित तिरोडा व परिसरातील बँकेत ग्रा.पं.च्या खाते व्यतिरिक्त बाहेर खाते उघडून अपहार केल्याची शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. याची चौकशी सुद्धा केली जात असल्याचे विद्यमान सरपंच लवंगदास भंडारी यांनी सांगितले.