आमराई लुप्त, रसायनयुक्त आंबा बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 08:55 PM2019-04-19T20:55:45+5:302019-04-19T20:56:12+5:30
ग्रामीण भागातील अतिस्वार्थापोटी जनतेकडून आमराया नष्ट होत असून ओसाड परिसर झाल्याचे दिसून येत आहे. आंबा हा फळांचा राजा असला तरी गावठी आंब्याची जागा कलमी आंब्यानी घेतली आहे. पयार्याने रसायनयुक्त आंब्याची चव घ्यावी लागत आहे. ग्रामिण परिसरातील गावठी आंब्याची चव संपल्यागत जमा असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील अतिस्वार्थापोटी जनतेकडून आमराया नष्ट होत असून ओसाड परिसर झाल्याचे दिसून येत आहे. आंबा हा फळांचा राजा असला तरी गावठी आंब्याची जागा कलमी आंब्यानी घेतली आहे. पयार्याने रसायनयुक्त आंब्याची चव घ्यावी लागत आहे. ग्रामिण परिसरातील गावठी आंब्याची चव संपल्यागत जमा असल्याचे दिसून येत आहे. गावठी आंब्याचे पाड पडू न देता हव्यासापोटी त्यापूर्वीच आंबे तोडून पिकविण्यासाठी सर्रासपणे रसायनांचा वापर केला जात असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेडोपाडी पूर्वी गावाशेजारी रस्त्याच्या दोन्ही कडेला आंब्याच्या झाडांच्या रांगा दिसत होत्या. परंतू शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे वृक्षांची कत्तल केली जात असून आंब्याची झाडे नामशेष झाल्यात जमा आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागात रस्ते मोठे करण्यासाठी आमराया नष्ट करण्यात आल्या आहेत. अशा वृक्षांची कत्तल आताही मोठ्या प्रमाणात दिसून येत असून याची अनेक उदाहरणे आजही पहावयास मिळतात. अमूल्य संपत्तीची कत्तल केली जात आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात लहान मुलांचे उन्हाळयातील खेळण्या-बागडण्याचे दिवस मामाच्या आमराईत जायचे. ‘मामाच्या गावाला जावू या, गोडगोड आंबे खावू या’ बालगीताप्रमाणे लहान मुले मामाच्या गावी जाऊन मौजमजा करीत होते. आताही सवाष्ण महिला आंबे खाण्याच्या नावाखाली माहेरी उन्हाळयाच्या दिवसात जात असतात. ही परंपरा आताही सुरुच आहे. त्यावेळी आंब्याच्या शीतल झाडाखाली अनेक खेळ खेळायचे. आता तर आमरायाच संपल्याने ग्रामीण भागातील लहान मुलांचे दिवस पानटपरीवर जाताना दिसत आहेत. आंबा फळाला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यापासून पन्हं व लोणचे असे चविष्ट पदार्थ उन्हाळयात बनविले जात असून आंब्याचा पाड पडल्यानंतर रसाचा आस्वाद चाखावयास मिळत असे.
आता गावरान आंब्याची झाडे विरळ झाली आहेत. गावरान आंब्याच्या रसाची नैसर्गिक चव न्यारीच आहे. गावरान आंब्याची झाडे कमी झाल्याने पाड पडलेले आंबे खाण्यासाठी मिळत नसून आंबे परिपक्व होण्यापूर्वी अथवा पाड पडण्यापूर्वीच लोभापायी कच्च्या आंब्यावर रासायनिक प्रक्रिया करुन आंबा विक्रीसाठी बाजारात आणला जातो. आंबा हे सर्वांचे आवडते फळ असून लहान बालकांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांना प्रिय आहे. हे हंगामी फळ असून आरोग्याच्या दृष्टीने पचनप्रक्रियेसाठी हितकारक आहे. ग्रामीण भागात आता नव्या प्रकारच्या कलमी आंब्याच्या झाडांची लागवड काही प्रमाणात झाली असून गावठी आंबाच मिळेनासा झाला आहे. फळांच्या दुकानात लंगडा, नीलम, तोतापुरी आदी जातीचे आंबे बाहेर राज्यातून विक्रीस आणले जात आहे. हा आंबा कार्बाईडमध्ये ठेवून किंवा तशाच प्रकारच्या इतर रासायनिकद्रव्यांचा वापर करुन पिकविला जातो.
या रासायनिक द्रव्यामुळे आंबा पिकून पिवळा दिसत असला तरी गावठी आंब्याची चव त्याला येऊच शकत नाही.
आंब्याला रासायनिक प्रक्रियेने पिकविणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असून सर्वसामान्य नागरिक आरोग्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष देत नाही.