२८४ गावांत मिळणार ‘अमृत आहार’

By admin | Published: August 19, 2016 01:22 AM2016-08-19T01:22:31+5:302016-08-19T01:22:31+5:30

सुदृढ बालक देशाची संपत्ती आहे. यासाठी कुणीही बालक कुपोषित जन्माला येऊ नये किंवा जन्मताच

'Amrit Diet' will be available in 284 villages | २८४ गावांत मिळणार ‘अमृत आहार’

२८४ गावांत मिळणार ‘अमृत आहार’

Next

नरेश रहिले गोंदिया
सुदृढ बालक देशाची संपत्ती आहे. यासाठी कुणीही बालक कुपोषित जन्माला येऊ नये किंवा जन्मताच कमी वजनाचे असले तरी त्यांना सकस आहाराबरोबर अतिरिक्त आहार पुरवून कुपोषणमुक्त करण्यासाठी आदिवासी भागावर विशेष लक्ष केंद्रीत केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आदीवासीबहुल तीन तालुक्यातील २८४ गावांमध्ये ‘अमृत आहार’ दिला जाणार आहे.
निवडलेल्या गावातील ७ महिन्यापासून ते ६ वर्षापर्यंतच्या बालकांना, गरोदर महिलांना आणि ज्या महिलांचे बाळ अंगावर दूध पिते त्या स्तनदा मातांना अमृत आहार म्हणून दररोज एक अंडे व २ केळी दिल्या जाणार आहेत.
आदिवासी गावातील महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कामात व्यस्त असतात. गर्भावस्थेत महिलांचे भोजन संतुलित असावे, परंतु आदिवासी भागातील महिला गरोदरपणातही मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतात. ज्या काळात त्यांना सकस आहार व विश्रांतीची गरज असते अशा काळात त्या सकस आहार सेवन करीत नाहीत. सोबतच विश्रांतीही घेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जन्माला घातले जाणारे बाळ कुपोषित होते.
जिल्ह्यातील देवरी, सालेकसा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील काही गावे मिळून एकूण २८४ गावांत हा अमृत आहार शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून पुरविला जाणार आहे.
स्तनदा माता, गर्भवती व बालकांना पूरक आहार म्हणून भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

४ कोटी २० लाखांचा निधी
जिल्ह्यात या योजनेचा लाभ १ हजार ८६४ स्तनदा मातांना सहा महिन्यापर्यंत, १ हजार ६४५ गरोदर महिलांना सहा महिन्यापर्यंत अमृत आहार दिला जाणार आहे. यासाठी २ कोटी रूपये महिला व बालकल्याण विभागाला मिळाले आहेत. १९ हजार ३९६ बालकांसाठी २ कोटी २० लाख रूपये संबंधित अंगणवाड्यांमध्ये वाटप करण्यात आले आहे. सन २०१६-१७ या वर्षासाठी हा निधी देण्यात आला आहे.
असा दिला जातो आहार
सोमवारी ते शुक्रवारदरम्यान दररोज आहारात चपाती किंवा भाकर, भात, डाळ, हिरव्या पालेभाज्या, अंडी किंवा पर्यायी अन्नघटक, शेंगदाणा लाडू, तर शनिवारी चपाती किंवा भाकर, भात, डाळ, हिरवी पालेभाजी, अंडी किंवा पर्यायी अन्नघटक व सोया दूध देण्याचे सूचविण्यात आले आहे.

Web Title: 'Amrit Diet' will be available in 284 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.