शहरात हरित क्षेत्र विकासाला लाभले ‘अमृत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 12:07 AM2018-06-01T00:07:18+5:302018-06-01T00:07:18+5:30
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या १३ जागांच्या विकासाची कामे सुरू आहे. सन २०१६-१७ व सन २०१७- १८ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली ही कामे असून या कामांसाठी ७३.१० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत हरित क्षेत्र विकास कार्यक्रमावर जोर दिला जात आहे. त्यानुसार, शहरात नगर परिषदेच्या मालकीच्या १३ जागांच्या विकासाची कामे सुरू आहे. सन २०१६-१७ व सन २०१७- १८ अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली ही कामे असून या कामांसाठी ७३.१० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या जागांवर बाग तयार करावयाचे असून हरित क्षेत्र विकासाच्या कामांना एकप्रकारे ‘अमृत’च लाभले असल्याचे म्हणता येईल.
गोंदिया शहराचा सर्वच क्षेत्रात विकास होत असला तरिही हरित क्षेत्राच्या बाबतीत शहर मागासलेलेच आहे. आजघडीला शहरात सिव्हील लाईन्स परिसरातील सुभाष बाग हे एकच बाग उरले असून याशिवाय दुसरे हिरवळीचे स्थान नाही. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी सुभाष बागेचीही स्थिती काही बरी नाही. नगर परिषदेकडून बागेला रेटत चालल्याचे दिसून येत आहे. शहरातील पिंडकेपार व कुडवा येथे नवे बाग तयार केले जात आहे. मात्र सध्यातरी शहरवासीयांना मोकळ््या हवेत श्वास घेण्यासाठी दुसरी जागाच उरलेली नाही. हीच बाब हेरून केंद्र शासनाच्या ‘अमृत’ अभियानांतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्पावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.
यातूनच, शहरातील हरित क्षेत्र विकासासाठी सन २०१६-१७ अंतर्गत नगर परिषदेच्या मालकीच्या सात जागा तसेच सन २०१७-१८ अंतर्गत सहा जागांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या जागांवर विविध कामे करून विकास करायचा व बाग तयार करण्याचे यात प्रस्तावीत होते. यातील सन २०१६-१७ मध्ये प्रस्तावीत करण्यात आलेल्या सात कामांसाठी ‘अमृत’ योजनेंतर्गत ४२ लाख १० हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर सन २०१७-१८ अंतर्गत प्रस्तावीत सहा कामांसाठी ३१ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांना १८ नोव्हेंबर २०१७ मध्ये मंजुरी मिळाली असून ही कामे सुरू आहेत. ही कामे पुर्ण झाल्यानंतर शहर नक्कीच हिरवळ दिसून येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
येथील जागांचा होणार विकास
सन २०१६-१७ मध्ये नगर परिषदेच्या मालकीच्या गणेशनगर परिसरातील चार, द्वारकानगरातील एक, कटंगीकला येथील एक व पैकनटोली बजाज वॉर्डातील एका जागेचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तर सन २०१७-१८ मध्ये मालवीय वॉर्डातील एक, लक्ष्मीनगर बँक कॉलनीतील एक, जुनेजा कॉलनीतील एक, गौरीनगरातील एक, कटंगीकला येथील एक, व महात्मा फुले वॉर्डातील एक जागा प्रस्तावीत करण्यात आली होती.
पिंडकेपार व डोंगरतलावचे काम प्रगतीपथावर
हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ मध्ये शहरातील पिंडकेपार व डोंगरतलाव येथील कामे प्रस्तावीत करण्यात आली होती. या कामांना १३ जुलै २०१७ रोजी मंजुरी मिळाली असून या कामांसाठी ७१ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून यात पाथवे, सुरक्षा भिंत, लॉन, वृक्षारोपण आदि कामे केली जाणार आहेत. एकंदर बाग तयार केली जाणार आहे.