'५० जवानांची ब्लडटेस्ट करायची आहे' असे सांगून तोतया आर्मी अधिकाऱ्याने डॉक्टरांना एक लाखाने गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 08:32 PM2022-05-17T20:32:52+5:302022-05-17T20:33:33+5:30
Gondia News गोंदिया शहराच्या न्यू लक्ष्मीनगरातील डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख (३७) यांना रक्त तपासणीच्या नावावर आर्मी अधिकारी असल्याचे सांगून तब्बल एक लाखाने लुटले.
गोंदिया : शहराच्या न्यू लक्ष्मीनगरातील डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख (३७) यांना रक्त तपासणीच्या नावावर आर्मी अधिकारी असल्याचे सांगून तब्बल एक लाखाने लुटले. ही घटना ९ मे रोजी दुपारी ३.३० ते ५ वाजता दरम्यान घडली.
शास्त्री वॉर्ड गोंदिया येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. सुनील बाळकृष्ण देशमुख (३७) यांना सतीशकुमार नावाच्या व्यक्तीने फोन केला. मी आर्मीतून बोलतो, आमच्या ५० जवानांची रक्त तपासणी करायची आहे. त्यांच्यासाठी किती खर्च येणार असे डॉक्टरांना विचारले. डॉक्टराने प्रतिव्यक्ती २ हजार असे सांगितल्यावर आरोपीने थोड्या वेळात क्रेडिट कार्डने मी आपल्याला पैसे पाठवितो. आमच्या ऑफिसर सोबत व्हॉट्सॲपवर बोला, असे सांगण्यात आले.
व्हिडिओ कॉलवर फोन करून त्यांना दुसऱ्या मोबाईलने प्रोसेस करायला सांगितले. त्यात त्यांच्या पत्नीच्या खात्यातील ५० हजार एकावेळी व दुसऱ्यावेळी सुद्धा ५० हजार असे एक लाख रुपये आपल्या खात्यात वळते करवून घेतले. यासंदर्भात १६ मे रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भादंविच्या कलम ४१९, ४२० सहकलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.