अनंतने केला धिंगाण्यांचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 12:31 AM2016-10-17T00:31:39+5:302016-10-17T00:31:39+5:30
घरातील एकाला जडलेल्या व्यसनामुळे घरातील सर्व कुटुंबाला भूर्दंड सहन करावा लागतो.
दारूड्यांनी धरली मंदिराची वाट : आजोबा व भावाच्या व्यसनामुळे उचलले पाऊल
नरेश रहिले गोंदिया
घरातील एकाला जडलेल्या व्यसनामुळे घरातील सर्व कुटुंबाला भूर्दंड सहन करावा लागतो. आपण उच्च शिक्षण घेऊन समाजात नाव लौकीक करण्याची जिद्द बाळगत असताना घरातील आजोबा व भावाच्या व्यसनामुळे त्यांना त्रास व्हायचा. गावातील चौकाचौकात सायंकाळी धिंगाणा घालणाऱ्यांना मंदिराची वाट धरण्यासाठी एकट्याने गावाला जागविले. सायंकाळच्या वेळी गावात धिंगाणा घालणाऱ्या लोकांना सन्मार्गाकडे वळविण्याचे काम गोरेगाव तालुक्याच्या पुरगाव येथील अनंतकुमार देवेंद्र ठाकरे या उच्च शिक्षीत तरूणाने केले. व्यसनमुक्तीचा अनंतकुमारने उचलेला विडा गावात लोकचळवळ होऊन बसला. त्यामुळे तो गावातील नागरिकांचा लाडका झाला.
मोटारसायकल मॅकेनिक म्हणून काम करणारे अनंतकुमार ठाकरे यांचे आजोबा, आजोबांचे भाऊ व त्यांचे भाऊ सन २००९ मध्ये मद्यसेवन करीत होते. त्यामुळे घराचे स्वास्थ बिघडले होते. गावातही अवैध दारूचा महापूर वाहत असल्याने गावातील चौकाचौकात दारूड्यांचा सायंकाळी व रात्री धिंगाणा असायचा. त्यावेळी गावातील एखादी तरूणी चौकातून जाऊ शकत नव्हती अशी अवस्था गावची होती. अशात गावकऱ्यांची दारूपासून मुक्ती करण्याचा चंग अनंतकुमारने बांधला. ग्रामपंचायत व आंगणवाडी समोर दारू दुकान होते. त्या दारू दुकानाचा विद्यार्थी मनावर विपरीत परिणाम पडत होता. ग्रामपंचायतमध्ये याच रस्त्यावरून जावे लागत असल्याने दारूड्यांचे नागरिकांसोबत वाद व्हायचे. त्यामुळे व्यसनापासून दूर असलेल्या लोकांना गाव सोडावे लागले किंवा त्यांना घरात राहावे लागले.
गावच्या या परिस्थितीवर अनंतकुमारने विचार करून गावातील अनिल पारधी, शिवशंकर ठाकरे, कमलेश बिसेन, राजेंद्र पारधी, संजय मेश्राम यांना सोबत घेऊन गावातील जेष्ठ नागरिक रामजी वाघाडे, शिवराम तुरकर यांच्या मार्गदर्शनात बैठक घेतली.
या बैठकीनंतर दारूबंदी होत होती परंतु आठ-दहा दिवसानंतर पुन्हा दारूविक्री सुरू व्हायची. दारूमुळे होणाऱ्या हाणीची माहिती लोकांना देण्याचे चार-पाच लोकांनी ठरविले. त्यामुळे लोक त्यांच्याशी जुळू लागले. परिणामी एकेकाळी दारूपिऊन धिंगाणा घालणाऱ्या पूरगावात शांतता नांदू लागली आहे.
२५ लोकांची दारूला तिलांजली
पूरगावात मागील सात-आठ वर्षात नऊ लोकांचा मृत्यू झाला. हे बघता गावातील २५ लोकांनी दारूला तिलांजली दिली.त्यामुळे त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.समाजातही त्यांचा मान आता वाढला आहे. अनंतकुमारने गावात दारूबंदी सुरू केली. याची भनक अवैध दारूविक्रेत्यांना लागताच त्यांना पैशांचे आमिष देऊन मॅनेज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. १५ हजार रूपये घेऊन दारूविक्रेते त्यांच्याकडे गेले होते. परंतु त्यांनी एकही न ऐकता गावाला व्यसनमुक्त करणे हाच माझे पुरस्कार आहे असल्याचे स्पष्ट सांगीतले.
१४ मे २०१० च्या ग्रामसभेत केली टिंगल
या विषयाला घेऊन विशेष ग्रामसभा बोलाविण्याची मागणी केली होती. त्यावर काही लोकांनी टिंगल केली. १४ मे २०१० रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत ३५० महिलांनी भाग घेतला होता. दारूबंदी समिती तयार करण्यात आली. वर्गणी गोळा करून बोर्ड तयार करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला १५ दिवसात एक व्यक्ती पकडण्यात आला. पोलिसांनी समितीवर दबाव आणला होता. परंतु तत्कालीन पोलीस अधिक्षक मो.सुवेज हक यांनी या तरूणांना सहकार्य केले होते.
तरूण दारूपासून दूर
गाव दारूमुक्त करण्यासाठी रात्रीच्यावेळी झाडावर चढून दारूविक्रेत्याला पकडण्यासाठी रात्र जागून काढावी लागत होती. १५ रूपयांचा टॉर्च खरेदी करून महिलांच्या मदतीने दारूविक्रेत्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात येत होते. दारूपिणाऱ्यांवर २५० रूपये दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. अनेक प्रकरण पोलीस ठाण्यात जात होते. दंड वसूल झाल्यास त्या राशीतून गावातील दुर्बल घटकांना मदत केली जात होती. दारूविक्रेत्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी गावात अनेक संभ्रम पसरविले होते. परंतु दारूविक्रेत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. दोन वर्षानंतर गावात व्यसनमुक्तीचा संकल्प दिवस साजरा करण्यात आला.