अन् हाती आलेले २८ हजार केले परत
By admin | Published: March 11, 2017 12:18 AM2017-03-11T00:18:42+5:302017-03-11T00:18:42+5:30
सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून आता प्रामाणिकपणा जिवंत आहे की नाही, अशी शंका यायला लागते.
वाहतूक नियंत्रक शिपायाचा प्रामाणिकपणा
खातिया : सगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून आता प्रामाणिकपणा जिवंत आहे की नाही, अशी शंका यायला लागते. मात्र सहजपणे हाती लागलेले २८ हजार रुपये संबंधित व्यक्तीला प्रमाणिकपणे परत करण्याचा चांगुलपणा दाखवून एका महिला पोलीस शिपायाने तमाम पोलीसवर्गाची मान उंचावली आहे.
त्याचे असे झाले की, १० मार्च रोजी खातिया येथील रहिवासी हिमांशू बहेकार हे गोंदिया येथे एलआयसी कार्यालयामध्ये पैसे भरण्यासाठी जात होती. जयस्तंभ चौकातील आयसीआयसीआय बँकच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी ते गेले असता एटीएममध्ये आपले २८ हजार रुपये असलेले पाकिट विसरुन गेले. त्यानंतर त्या एटीएममध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी मंगला बाबूलाल प्रधान (ब.नं.५८०) गेल्या असता त्यांना ते पाकिट मिळाले. त्यांनी तिथे उपस्थित लोकांना त्या पाकिटाबद्दल विचारले मात्र कोणीही ते आपले असल्याचे सांगितले नाही.
दरम्यान पाकिटधारक हिमांशू बहेकार एलआयसी कार्यालयात गेल्यानंतर त्यांना आपले पाकीट कुठेतरी हरवले याची जाणीव झाली. ते एटीएम मशीनजवळ आले मंगला प्रधान ते पाकिट कोणाचे आहे याचा सुगावा लागतो का म्हणून पाकिट उघडून पाहात होत्या. त्यांनी बहेकार यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, एटीएम कार्ड सर्व पाहून ते त्यांचेच असल्याची खात्री पटविली आणि त्यांना त्यातील पैशांसह परत केले. यावेळी कामठाचे तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुशील खरखाटे, होमगार्ड सुरसाऊत आदी उपस्थित होते.(वार्ताहर)