अन् जिल्हाधिकारी पोहोचले बांध तलावावर
By admin | Published: September 16, 2016 02:46 AM2016-09-16T02:46:10+5:302016-09-16T02:46:10+5:30
शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या
तळ्याचे पाणी घरात : अतिक्रमणातून उभारलेली भिंत तोडण्याचे आदेश
गोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरात असलेल्या बांधतलावाचे पाणी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असलेल्या पावसामुळे तलावातून बाहेर निघून रस्त्यांवर आणि नागरिकांच्या घरात येत आहे. अतिक्रमणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला. त्याची दखल घेत गुरूवारी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश न.प. मुख्याधिकाऱ्यांना दिले.
तलावातील ओव्हरफलोचे पाणी निघण्यासाठी शेतशिवाराजवळून नाला वाहतो. मात्र त्या नाल्यावर अतिक्र मण करून भिंत बांधण्यात आली आहे. त्यामुळे बांधतलावाचे पाणी जाण्यासाठी मार्ग मिळत नसल्याने पाणी सुर्याटोला परीसरातून रामनगर रस्त्यांवर वाहत आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये हे पाणी शिरत आहे. रस्त्यावरही दोन ते तीन फुट पाणी वाहते. या रस्त्यावरून लोकांना येणे-जाणे कठीण झाले आहे. लहान मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे असे लोक संपूर्ण दिवस घरातील पाणी बाहेर काढण्यात व्यस्त होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून घरांत शिरलेले पाणी काढण्यात व्यस्त असल्याने त्यांचा रोजगार बुडत आहे. ही स्थिती बांधतलावर असलेल्या अतिक्रमणामुळेच उद्भवल्याची माहिती परीसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली.
बांधतलाव क्षेत्रातील सूर्याटोला रोडवर ज्यांनी अतिक्र मण केले आहे अशा अतिक्र मणधारकांना अतिक्र मण काढण्यासाठी नगर परिषदेकडून नोटीस देण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सांगितले.
बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुर्यवंशी यांनी सूर्याटोला तसेच बांधतलाव येथे भेट दिली व बांधतलावावर असलेले अतिक्र मण व परीसराची पाहणी केली. हे प्रकरण गंभीर असल्यामुळे बांधतलावावर असलेले अतिक्र मण तत्काळ हटविण्याचे निर्देश तहसीलदार यांनी दिले आहेत.
बांधतलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी निघण्यासाठी कुडव्याकडे असलेल्या नाल्यावर अतिक्रमण करून बांधलेल्या भिंती तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यापूर्वीच तहसीलदारांना आदेश दिले होते. मात्र स्थिती गंभीर असल्याने दोन दिवसात हे अतिक्र मण हटविण्यात येईल व परीस्थितीवर नियंत्रण मिळविले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी या पाहणीनंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या भागातील नागरिकांना सदर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)