अन् त्याने नऊ तास झाडावर काढले
By admin | Published: September 14, 2016 12:20 AM2016-09-14T00:20:06+5:302016-09-14T00:20:06+5:30
सलग दोन दिवस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला.
पुराचा फटका : काळ आला होता, पण वेळ नाही
सालेकसा : सलग दोन दिवस तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराचा फटका बसला. यादरम्यान सालेकसा येथील भरत फुंडे या शेतकऱ्याला शेंढा नाल्यात आलेल्या पुराने जीवन-मरणाच्या खेळात अडकून पडावे लागले. सकाळपासून सायंकाळपर्यंत सतत नऊ तास फुंडे यांनी आंब्याच्या झाडावर उपाशीपोटी काढले. सुदैवाने सायंकाळी त्यांना जीवनदान मिळाले. युवकांनी फुंडे यांना दोरीच्या सहाय्याने पुरातून सुखरुप बाहेर काढून घरी पोहोचण्यास मदत केली. त्यामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीची प्रचिती अनेकांनी घेतली.
आमगाव खुर्द (सालेकसा) येथील ६० वर्षीय शेतकरी भरत फुंडे यांचे शेत हाजराफॉल परिसरातून निघणाऱ्या रोंढा नाल्याच्या किनाऱ्यालगत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे फुंडे यांनी विद्युत पंप लावून शेतीला पाणी देणे सुरू केले होते. दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्याने नाल्यावर लावलेला पंप काढून घेण्यासाठी ते सकाळी ७ वाजता सुमारास आपला मुलगा अजय फुंडे (२३) यांच्यासोबत सायकलने शेतात गेले. पाण्याचा पंप काढत असतानाच नाल्याच्या पाण्याची पातळी वाढत गेली. हे पाहून त्यांचा मुलगा नाल्याच्या पलीकडे सायकल घेऊन बाहेर निघाला. वडीलसुद्धा आता बाहेर निघतील म्हणून वाट राहीला. परंतु बघता-बघात रोंढा नाल्याला जबदस्त पुराचा लोंढा आला आणि शेतासह संपूर्ण परिसर पुराच्या तडाख्यात सापडले. फुंडे यांनी ‘मरता, क्या न करता’ याप्रमाणे हिमत लावून शेतातील आंब्याच्या झाडावर चढून राहण्यासाठी कसरत सुरू केली व अखेर ते झाडावर चढण्यात यशस्वी झाले. परंतु पुराच्या पावसाने आंब्याच्या झाडाला सुद्धा अर्ध्या उंचीपर्यंत गाठले.
एकीकडे झाडावर चढूनही पुरात डुबण्याची भिती तर अशावेळी झाडावर साप, विंचवासारखे विषारी प्राणी चढण्याची होती. या भितीमध्येच त्यांनी झाडावर घट्ट बसून तब्बल नऊ तास काढले. दुसरीकडे त्यांचा मुलगा वडीलाचा काही पत्ता लागत नसताना त्याने नाल्यापलीकडील रोंढा गावात जाऊन दुसऱ्या मार्गाने परत येण्याचे ठरविले. परंतु पुरामुळे मुख्य रस्त्यावर सर्वत्र पुलावरुन पाणी वाहत गेल्यामुळे रस्ते बंद झाले होते. शेवटी त्याने लांब फेऱ्याचा कालव्याचा रस्ता पकडून पाच सहा कि.मी. अंतर पार करीत आमगाव खुर्दला पोहोचला. परंतू वडील घरी परत आले नव्हते. शेवटी मोहल्ल्यातील युवकांनी भरत फुंडेचा शोध घेणे सुरु केले. लांब दोराच्या मदतीने तारेवरची कसरत करीत शेताच्या परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा भरत फुंडे आंब्याच्या झाडावर दिवसभर बसून असल्याचे कळले. युवकांनी त्यांना आपल्या कौशल्याने सुखरुप बाहेर काढले.