अन् कलामांना आठवली गोंदियाची बिडी...
By admin | Published: July 29, 2015 01:21 AM2015-07-29T01:21:32+5:302015-07-29T01:22:11+5:30
माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम म्हणजे अफाट ज्ञानाचा खजिनाच. पण आपल्या ज्ञानाचा, पदाचा कुठलाही लवलेश आपल्या वागण्यातून झळकू न देणारा....
साधेपणात दिसला ज्ञानपुरूष : शल्यविषारद जैन यांचा अनुभव
गोंदिया : माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम म्हणजे अफाट ज्ञानाचा खजिनाच. पण आपल्या ज्ञानाचा, पदाचा कुठलाही लवलेश आपल्या वागण्यातून झळकू न देणारा त्यांच्यातील साधा माणूस अनुभवण्याचे भाग्य लाभले ते गोंदियातील सुप्रसिद्ध शल्यविषारद डॉ.राजेंद्र जैन यांना.
९ वर्षांपूर्वी, अर्थात २००६ मध्ये डॉ.कलाम यांनी एका विशेष कामगिरीसाठी डॉ.जैन यांच्यासह त्यांच्या चमूतील सर्व १० लोकांना राष्ट्रपती भवनात पाचारण करून त्यांचा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे केवळ राष्ट्रपतींनी चांगल्या कामगिरीसाठी कोण्या व्यक्तींचे केलेले ‘औपचारिक’ कौतुक नव्हते. हा आमच्यासाठी कलाम सरांचा एक ‘क्लास’च होता. या भेटीत त्यांनी विचारलेली माहिती आणि त्यातून भारतात प्रत्येक क्षेत्रात चांगले काय करता येईल यासाठी दिसलेली त्यांची तळमळ आम्हाला सर्वांनाच भारावून गेली, असे डॉ.जैन म्हणाले.
याबाबत माहिती देताना डॉ.जैन यांनी सांगितले, पंतप्रधानांचे ओएसडी अखिल बक्क्षी यांच्या संस्थेकडून २००६ मध्ये गोंडवाना लॅन्ड एक्स्पिडिशन काढण्यात आली होती. त्यात २ भूगर्भशास्त्रज्ञ, १ वनस्पतीशास्त्रज्ञ, १ प्राणीशास्त्रज्ञ आणि डॉक्टर म्हणून माझी निवड झाली होती. भारत ते दक्षिण आफ्रिका या २५ हजार किलोमीटरच्या त्या प्रवासात १७ देशांना भेटी देऊन तेथील जीवनमानाचा आणि भौगोलिक गोष्टींचा अभ्यास आम्ही केला. ९६ दिवसांची ती मोहीम कारच्या प्रवासाने पूर्ण केल्यानंतर तत्कालीन मोहीमेतील सर्व १० सदस्यांना राष्ट्रपती डॉ.कलाम यांनी राष्ट्रपती भवनात पाचारण केले. यावेळी केवळ औपचारिक सत्कार न करता त्यांनी प्रत्येक सदस्याला त्याला आलेले अनुभव विचारले. काय पाहिले, त्यातून काय शिकले हे विचारले. मी गोंदियावरून आलो असे सांगितले त्यावेळी ‘गोंदिया.. बिडी’ असे मिष्किलपणे उद्गारून आपल्या ज्ञानाचा परिचय दिला, असे डॉ.जैन यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)