अन्...उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

By admin | Published: May 30, 2017 12:55 AM2017-05-30T00:55:54+5:302017-05-30T00:55:54+5:30

मग्रारोहयोमध्ये गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम असला तरी गोंदिया जिल्ह्याचे रोजगार हमी योजनेचे काम ‘रेकॉर्ड ब्रेक’ व्हावे ...

And ... the meeting took place in the summer by the District Collector | अन्...उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

अन्...उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

Next

नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मग्रारोहयोमध्ये गोंदिया जिल्हा राज्यात प्रथम असला तरी गोंदिया जिल्ह्याचे रोजगार हमी योजनेचे काम ‘रेकॉर्ड ब्रेक’ व्हावे यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पुढचे पाऊल उचलले आहेत. मजुरांच्या संवेदना अधिकारी-कर्मचाऱ्यांना कळाव्यात, यासाठी ४५ अंश तापमान असलेल्या रखरखत्या उन्हात जिल्हाधिकाऱ्यांनी गोरेगाव तालुक्याच्या सारंगपूर येथील मग्रारोहयोच्या कामावर बैठक घेतली. ही बैठक १० मिनिटे, २० मिनिटे किंवा अर्धा तास नव्हे तर तब्बल एक तास चालली. जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मागेल त्याला शंभर दिवस काम असे शासनाने ठरवून त्यांना मग्रारोहयो अंतर्गत काम उपलब्ध करुन देण्याची संधी जिल्हा प्रशासनाने करावी, अशा सूचना दिल्या. भर उन्हात दिवसभर राबराब राबूनही वेळेवर मजुरांना त्यांची हक्काची मजुरी मिळत नाही. उन्हात काम करताना त्यांना किती चटके लागतात. परंतु अधिकाऱ्यांना त्यांच्या संवेदनांची कल्पना नसते. मजुरांच्या समस्या, त्यांच्या संवेदना अधिकारी-कर्मचाऱ्यांना असाव्यात यासाठी मग्रारोहयोच्या कामात राज्यात प्रथम असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व खंडविकास अधिकारी यांची बैठक २४ मे रोजी गोरेगाव तालुक्याच्या सारंगपूर येथे घेण्यात आली. या बैठकीला काही अधिकारी गैरहजर होते. तर काही उशिरा पोहोचले. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी सडक-अर्जुनी तालुक्याच्या पाटेकुर्रा येथे ही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना रोहयोच्या कामावर मजुरांची असलेल्या स्थितीची वास्तविकता त्यांनी यावेळी करुन दाखविली. मजूरवर्ग भर उन्हात काम करूनही १५० रूपये मजुरी त्यांना आपण देतो त्यांच्या तुलनेत अधिकारी-कर्मचारी लठ्ठ पगार घेऊनही बरोबर काम करीत नाही. त्यांना या मजुरांपासून प्रेरणा घ्यावी, याही मागचा उद्देश ठेवत सदर बैठक भर उन्हात तब्बल एक तास घेण्यात आली.
या बैठकीला स्वत: जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, मुख्य कार्यपालन अधिकारी रवी ठाकरे, उपजिल्हाधिकारी (मग्रारोहयो) आर.टी. शिंदे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, खंडविकास अधिकारी उपस्थित होते.
सारंगपूर येथे रखरखत्या उन्हात बैठक घेतली त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी उपस्थित झालेल्या नागरिकांनी उन्हाचे चटके सहन न करता त्यांनी झाडाच्या सावलीचा आश्रय घेतला. परंतु सर्व अधिकारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकीत उपस्थित होते.
मजूर ज्या ठिकाणी उन्हात काम करीत आहेत त्याच ठिकाणी बैठक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मजुरांच्या संवेदना अधिकाऱ्यांना जाणण्यास भाग पाडले.

मागच्या वर्षी मजुरीवर १२२ कोटी खर्च
गोंदिया जिल्ह्यात २ लाख ३७ हजार कुटुंबांनी मग्रारोहयोच्या कामासाठी जॉब कार्ड तयार केले. त्यातील १ लाख ४० हजार मजूर प्रत्यक्ष कामावर आहेत. एकाच वेळी ८० ते ९० हजार मजूर काम करीत आहेत. गोंदिया जिल्ह्याने सन २०१६-१७ या वर्षासाठी १५७ कोटी रुपयांची मजुरी देण्याची तरतूद केली होती. मजुरांनी केलेल्या कामामुळे १२२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. एका मजुराला १५४ रुपये मजुरी व ६४ दिवस या वर्षात मजुरीसाठी मिळाले आहेत.
९० ते १०० दिवस काम देण्याचे नियोजन
मागच्या वर्षात गोंदिया जिल्ह्यातील मजुरांना ६४ दिवस काम देण्यात प्रशासन यशस्वी राहिले. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ९० ते १०० दिवस काम देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील धान पिकाची कापणी झाल्याबरोबर डिसेंबर महिन्यापासूनच काम सुरु केल्यास मजुरांना कमी उन्हात १०० दिवस काम करणे शक्य होईल.
जिल्ह्यात ३१ मे रोजी बैठका
संबंधित तहसीलदार, खंडविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, आॅपरेटर व कंत्राटी अभियंते यांच्या बैठका गावागावात घेतल्या जाणार आहेत. डिसेंबरपासून मजुरांना काम कसे देता येईल यासाठी नियोजन केले जाणार आहे. मजुरांच्या तलावाच्या काठी बैठका होणार आहेत. ३१ मे रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान या बैठका होणार असल्याने तालुका स्तरावरील बैठका सावलीत की उन्हात, याकडे मात्र मजुरांचे लक्ष राहणार आहे.

मजुरांची मजुरी वेळीच मिळावी. मजुरी काढण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने पुढाकार घ्यावे, यासाठी मजुरांच्या समस्या व संवेदना त्यांना माहीत असणे आवश्यक आहे. भर उन्हात ते वर्षभर राबत असतील तर एक तास अधिकाऱ्यांनी उन्हात घालवले तर त्याची किंमत कळेल. यासाठी या सभा मग्रारोहयोच्या कामावरच घेतल्या आहेत.
अभिमन्यू काळे
जिल्हाधिकारी, गोंदिया
मजुरांच्या कामाची गतीमानता वाढविण्यासाठी तसेच त्यांची मजुरी तत्काळ मिळावी या उद्देशातून रोहयोच्या कामावर सभा घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी सुरु केलेला प्रयोग मजुरांच्या मेहनतीला रंगत आणणारा आहे.
रवी ठाकरे
मुख्य कार्यपालन अधिकारी, जि.प. गोंदिया.

Web Title: And ... the meeting took place in the summer by the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.