महिनाभरापासून अंगणवाडी बंद
By admin | Published: June 17, 2017 12:17 AM2017-06-17T00:17:02+5:302017-06-17T00:17:02+5:30
तिरोडा तालुक्याच्या बोदा येथील अंगणवाडी इमारतीला गावच्याच एका नागरिकाने मालकी हक्क सांगून कुलूप ठोकला.
नुकसान बालकांचे : कुलूप लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बोदा येथील अंगणवाडी इमारतीला गावच्याच एका नागरिकाने मालकी हक्क सांगून कुलूप ठोकला. परिणामी महिनाभरापासून अंगणवाडी बंद आहे. या प्रकरणास तलाठी व बाल प्रकल्प अधिकारी यांचा हलगर्जीपणा जबाबदार असून त्यांनी तालुका दंडाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
तलाठी साजा-३ अंतर्गत बोदा येथे ग्रामपंचायतमार्फत २०१० ला इमारत तयार करण्यात आली होती. तलाठी जी.बी. हटवार यांनी सदर इमारत चिंतामन बघेले यांच्या खासगी जागेत असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या जागेतील इमारत आपलीच आहे, असे समजून बघेले यांनी ८ मे २०१७ रोजी त्या इमारतीला कुलूप ठोकला. हा प्रकार तलाठी जी.बी. हटवार यांच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचे बोलले जात आहे.
ज्यावेळी इमारत बांधायची असते त्यावेळी जमिनीचा सातबारा, नकाशा घ्यावा लागतो. सातबारामध्ये शाळेची नोंद आहे. परंतु तलाठ्यांनी सदर जागा चिंतामन बघेले यांची सांगितल्याने जमिनीवरच नव्हे तर शासकीय इमारतीला कुलूप ठोकून गंभीर गुन्हा केला आहे. या इमारतीत अंगणवाडी-२ बसत होती. कुलूप लागल्याने आता ती बंद आहे. बघेले यांनी कुलूप लावल्याने बालकांचा तसेच पोषण आहार लाभार्थ्यांना लाभ मिळू शकला नाही. अंगणवाडी सेविका सुनिता पारधी यांनी दवनीवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र पोलिसांनी कसलीही कारवाई केली नाही. बाल विकास प्रकल्प अधिकारी काळे व तिरोडा तहसीलदार यांना सदर माहिती देण्यात आली आहे.
तहसीलदार संजय रामटेके यांनी तलाठी यांच्या ११ मे २०१७ च्या प्रतिवेदनावर २६ मे २०१७ ला नायब तहसीलदार यांना पत्र देवून मालकी हक्काची व रेकार्डची तपासणी करून विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता अवैधरित्या लावण्यात आलेले कुलूप काढून टाकणे आवश्यक असल्याचे सांगितले. अधिनस्त मंडळ अधिकारी आणि तलाठ्याच्या सहकार्याने बघेले यांची समज घालून तीन दिवसांत कारवाई करण्याचे आदेश देवून अहवाल मागितले. याची प्रत खंडविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली. मात्र तहसीलदारांच्या पत्रावर कोणतीच कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी केली नाही. त्यामुळे महिनाभरापासून अंगणवाडी बंद असून इतर कामेसुद्धा रखडली आहेत.
आता बाल प्रकल्प अधिकारी, खंड विकास अधिकारी, तलाठी तसेच पोलीस व ग्रामपंचायत कोणती कार्यवाही करते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
दिलीप बन्सोड यांनी खडसावले
माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी सभापती उषा किंदरले, उपसभापती डॉ. किशोर पारधी व इतर पदाधिकाऱ्यांसह बाल प्रकल्प कार्यालयास भेट दिली. प्रकल्प अधिकारी काळे यांच्याकडून माहिती जाणून घेतली व आजपर्यंत कसलीही कार्यवाही केली नसल्याने प्रकल्प अधिकारी काळे यांना खडसावले. तसेच बालकांचे नुकसान होणार नाही, यासाठी तत्काळ लक्ष द्यावे, अशी समज दिली.