ती छोट्याशा खोलीत भरविते अंगणवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:20 PM2019-02-25T22:20:48+5:302019-02-25T22:21:02+5:30
येथील नगर पंचायत अंतर्गत रामजीटोला येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकेने चिमुकल्यांचे नुकसान होवू नये यासाठी स्वत:च्या आठ बाय सहाच्या खोलीत अंगणवाडी सुरू केली.
विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : येथील नगर पंचायत अंतर्गत रामजीटोला येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. ही इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.मात्र प्रशासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने अंगणवाडी सेविकेने चिमुकल्यांचे नुकसान होवू नये यासाठी स्वत:च्या आठ बाय सहाच्या खोलीत अंगणवाडी सुरू केली.मागील तीन वर्षांपासून ती या छोट्याशा खोलीत अंगणवाडी चालवित आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
नगर पंचायत सालेकसा अंतर्गत रामजीटोला येथे मागील अनेक वर्षांपासून अंगणवाडी केंद्र सुरु आहे. सध्यास्थितीत तीन ते सहा वर्ष वयोगटातील २८ मुले-मुली अंगणवाडीत शिकायला आहेत. उर्मिला भागवत लिल्हारे या अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. शासनाच्या वतीने अंगणवाडी केंद्रासाठी इमारत उभारण्यात आली. मात्र आता ही इमारत पूर्णपणे जीर्ण व धोकादायक झाली आहे. इमारतीच्या छत सुध्दा जीर्ण झाले आहे. तर पावसाळ्यात इमारतील गळती लागते. भिंतीचे प्लास्टर सुध्दा पडत असल्याने या इमारतीत अंगणवाडीच्या चिमुकल्यांना शिकविणे म्हणजे धोका होता. जीर्ण इमारत व चिमुकल्यांचा जीवाचा विचार करुन उर्मिला शहारे यांनी आपल्या स्वत:च्या घरी छोट्याशा खोलीत अंगणवाडी भरविण्यास सुरूवात केली.
मागील तीन वर्षांपासून ते या इमारतीत चिमुकल्यांवर संस्कार करीत आहेत. अंगणवाडीच्या जीर्ण इमारतीची माहिती पर्यवेक्षक व अंगणवाडी सेविकेने अनेकदा बालविकास प्रकल्प कार्यालयाला दिली. मात्र तीन वर्षांच्या कालावधी लोटूनही याची दखल घेण्यात आली नाही. परिणामी अंगणवाडी सेविकेला आपल्या छोट्याशा खोलीत अंगणवाडी चालवावी लागत आहे. यासाठी त्यांना विविध अडचणींना सुध्दा तोंड द्यावे लागत आहे. मात्र त्यांनी आपले कार्य थांबविले नाही. काहीही झाले तरी चिमुकल्यांचे नुकसान होवू देणार नाही असा संकल्पच उर्मिला लिल्हारे यांनी केला आहे.
रामजीटोला येथे अंगणवाडी केंद्र क्रं.११० साठी इमारत नसल्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. पण अद्यापही त्याला मंजुरी मिळाली नाही.
- एस.एन. बोपचे
विस्तार अधिकारी, सालेकसा.
ही अंगणवाडी अद्यापही नगर पंचायतकडे हस्तांतरीत करण्यात आली नाही. त्यामुळे अंगणवाडी इमारत बांधकामाचा प्रस्ताव घेता येत नाही.
- उमेदलाल जैतवार
बांधकाम सभापती न.प.सालेकसा