अंगणवाडीसेविका झाल्या स्वीच ऑफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:31 AM2021-08-26T04:31:34+5:302021-08-26T04:31:34+5:30
गोंदिया : अंगणवाडीसेविकांना अधिक गतिशील करण्यासाठी शासनाने त्यांना मोबाइल देऊन त्यावर माहिती पाठविणे अनिवार्य केले. मात्र, पुरवठा करण्यात आलेले ...
गोंदिया : अंगणवाडीसेविकांना अधिक गतिशील करण्यासाठी शासनाने त्यांना मोबाइल देऊन त्यावर माहिती पाठविणे अनिवार्य केले. मात्र, पुरवठा करण्यात आलेले मोबाइल निकृष्ट दर्जाचे आहेत. इंग्रजीत माहिती भरण्याची अट ठेवली आहे. मोबाइलवर माहिती न पाठविणाऱ्या अंगणवाडीसेविकांचे पगार कपात केले जात आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या गोंदिया शहरातील अंगणवाडीसेविकांनी बुधवारी (दि.२५) येथील रिंग रोडवरील बालविकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविला. मोबाइल स्वीच ऑफ करीत ते प्रकल्प अधिकाऱ्यांना सपूर्द केले.
कुठलेही प्रशिक्षण न देता अंगणवाडीसेविकांना मोबाइल देऊन त्यात इंग्रजीत माहिती भरणे अनिवार्य केले आहे. माेबाइलदेखील बरोबर चालत नसून त्याच्या दुरुस्तीसाठी अंगणवाडीसेविकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर, वेळेत माहिती भरली नाही म्हणून त्यांचा पगार कपात केला जात आहे. याचाच निषेध नोंदविण्यासाठी अंगणवाडीसेविकांनी राज्यभरात मोबाइल वापस आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन आयटक, गोंदिया शहर शाखेव्दारे बुधवारी मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन करण्यात आले. बालविकास विभागाने निकृष्ट दर्जाचे मोबाइल वाटप केल्याच्या घोषणा या वेळी दिल्या. महाराष्ट्राची भाषा मराठी असल्याने अंगणवाडीसेविकांना मराठी ॲप उपलब्ध करून द्यावे, मोबाइल दुरुस्तीचा खर्च देण्याची मागणी केली.
विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना देण्यात आले. सर्व अंगणवाडीसेविकांनी मोबाइल वापस केले. मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, विठा पवार, प्रणिता रंगारी, प्रतिभा दहीकर, महेश्वरी बिसेन, आशा कोल्हे, चंदा मेश्राम, माया बोरकर, कल्पना मेश्राम, नीलिमा बन्सोड, स्मिता बन्सोड, रजनी बर्वे, चेतना लोंगभासे, लक्ष्मी मनघटे यांनी केले.