संतप्त पालकांनी शाळेचे कुलूप उघडू दिले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 09:32 PM2019-01-28T21:32:26+5:302019-01-28T21:32:46+5:30
शिक्षण विभागाकडे वांरवार शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या मोहगाव-तिल्ली येथील पालकांनी आज (दि.२८) सकाळी जि.प.शाळेला लागलेले कुलूप उघडू दिले नाही. तर विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : शिक्षण विभागाकडे वांरवार शिक्षकाचे रिक्त पद भरण्याची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या मोहगाव-तिल्ली येथील पालकांनी आज (दि.२८) सकाळी जि.प.शाळेला लागलेले कुलूप उघडू दिले नाही. तर विद्यार्थी व पालकांनी शाळेच्या प्रवेशव्दारावर ठाण मांडले होते.
मोहगाव-तिल्ली येथील जिल्हा परिषद केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. या शाळेत सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पदवीधर व उच्चश्रेणी मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे. मागील सहा महिन्यांपासून पद रिक्त असताना प्रभारी मुख्याध्यापक एच.के.धपाडे यांची बदली करण्यात आली.
प्रभारी मुख्याध्यापकाच्या बदली प्रकरणाने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्याना बसवून शाळा उघडू देणार नाही असा पवित्रा घेतला. आधी रिक्त पदे भरा नंतरच शिक्षकांची बदली करा अशी मागणी लावून धरली. जोपर्यंत बदली आदेश रद्द होणार नाही व सहा महिन्यांपासून रिक्त असलेले शिक्षकांचे पद भरले जाणार नाही तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडू देणार नाही, असा पवित्रा पालकांनी घेतला आहे.
शिक्षण विभाग एकीकडे जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा सामोर आला आहे.
सरपंच अल्का पाथोडे, उपसरपंच दिगंबर कटरे, रेवालाल गौतम, सुकचारी रहांगडाले, लोकराम बोपचे, चुन्नीलाल गौतम, यादोराव बोपचे, विनोद पटले, खिलेश्वर बोपचे, ज्योती जगनित, मालीक गौतम, ब्रिजलाल पटले व गावकºयांनी शाळेच्या प्रवेशव्दारासमोरच ठाण मांडले होते. शिक्षण विभाग यासंदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.