कुशन व्यवसायातून अंजली गटाने घेतली भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:40 PM2019-02-26T21:40:00+5:302019-02-26T21:40:43+5:30
एकीकडे बेरोजगारी व दुसरीकडे पैशाची चणचण, या पेचात सापडलेल्या एका महिलेने १२ महिलांचा स्वयंसहायता समूह तयार केला व उमेद अभियानाशी जोडले. तिने कुशन व्यवसायाचे जिल्हा व राज्याबाहेर प्रशिक्षण घेऊन आपल्या गटातील सर्व महिलांना प्रशिक्षित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एकीकडे बेरोजगारी व दुसरीकडे पैशाची चणचण, या पेचात सापडलेल्या एका महिलेने १२ महिलांचा स्वयंसहायता समूह तयार केला व उमेद अभियानाशी जोडले. तिने कुशन व्यवसायाचे जिल्हा व राज्याबाहेर प्रशिक्षण घेऊन आपल्या गटातील सर्व महिलांना प्रशिक्षित केले. तसेच उमेद अभियानातून मिळालेल्या विविध अनुदांनातून गटाने आपला उद्योग वाढविला व कुशन व्यवसायातून उंच भरारी घेतली आहे.
येथील फुलचूर परिसरात रविवारपासून (दि.२४) सुरू असलेल्या जिल्हा कृषी व पलास महोत्सवात एकाच दिवसात अंजली समुहाने तब्बल १० हजारांची विक्र ी केली. कल्पना नेवारे रा. गंगाझरी असे त्या महिलेचे नाव आहे. त्या गंगाझरी येथील अंजली स्वयंसहायता समुहाच्या सचिव आहेत.
गटातील कल्पना नेवारे व मनू दमाहे यांनी पलास महोत्सवात स्टॉल लावून समुहाने तयार केलेल्या सर्व वस्तू पलास महोत्सवात विक्र ीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. यात लहान-मोठ्या बॅग, मोबाइल कव्हर, विविध प्रकारचे आकर्षक पडदे, रु माल,पेंटिंग केलेले कापड, पायदाण, सोफा कव्हर आदि वस्तुंचा समावेश आहे. तसेच सदर समूह वड्या, पापड, कुरोळ्या, चकल्या, दही मिरची, लाडू, शंकरपाडे या वस्तु सुद्धा तयार करून विक्र ी करतो.याचे प्रशिक्षण त्यांनी नंदूरबार येथे घेतले होते. साध्या कापडावर वर्क करून चादर तयार करतात.त्यामुळे या समुहातील सर्व महिला आत्मनिर्भर झाल्या असून इतर गटातील महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळत आहे.
कल्पना नेवारे व मनू दमाहे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की त्यांनी उत्तराखंडच्या देहरादून येथे कुशन व्यवसायचे प्रशिक्षण घेतले. वर्कचे प्रशिक्षण गुजरातमध्ये घेतली. सर्वप्रथम त्यांनी मंगळसूत्र तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. स्वत: तयार केलेले मंगळसूत्र घालून त्या गटाच्या बैठकीला गेले. इतर महिलांनी ते मंगळसूत्र बघून स्वत:साठी तयार करण्यास संगितले. त्याची २०० रु पयाला एक याप्रमाणे चार मंगळसूत्र विक्र ी झाले. इतर महिलांनाही त्यांनी सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे सुरू केले. तिथूनच या समुहाचा भरारी घेण्याचा प्रवास सुरू झाला.
अंजली गटाचे स्टॉल मुंबई, वर्धा, नागपूर, देहरादून, चंद्रपूर अशा मोठमोठ्या शहरात भरलेल्या प्रदर्शनीत लागले. त्यात त्यांनी लाखो रुपयांची विक्र ी करून हजारो रूपयांचा नफा मिळविला.
मागील आठवड्यात मुंबईमध्ये भरलेल्या प्रदर्शनीत अंजली समुहाच्या स्टॉलने एक लाखाच्या वर वस्तूंची विक्री केली. आता गंगाझरी येथील या समुहातील महिलांच्या घरूनही सदर वस्तुंची विक्र ी होत आहे. घरून महिन्याकाठी १० ते २० हजारांची विक्र ी होत आहे. उत्पन्न नियमित मिळत असल्यामुळे या गटातील सर्व महिला या उद्योगाकडे वळल्या आहेत.या समुहाच्या यशामुळे इतर अनेक गटांना चालना मिळत आहे.
कर्जाची नियमित परतफेड
अंजली समुहाने सर्वप्रथम २० हजार रु पयाचे कर्ज बँकेतून घेतला होता. त्या कर्जाची परतफेड करून ४ लाखांच्या कर्जाची उचल केली. त्यातून समुहाने आपला व्यवसाय वाढवून या कर्जाची सुद्धा नियमित परतफेड केली.त्यानंतर ४० हजार रु पयांचे कर्ज उचलले.त्यापैकी आता केवळ १० हजार रूपयांचा कर्ज शिल्लक आहे. आता या समुहाला १२ महिलांसाठी १२ लाख रु पयांच्या कर्जाची गरज आहे. यातून अंजली गटातील प्रत्येक महिलेचे कुटुंब आत्मनिर्भर होण्यासाठी मदत मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
माहेरचा गुण सासरी उपयोगी
कल्पना नेवारे यांनी माहेरीच आपल्या भावाकडून ब्लाऊज, पेटीकोट तयार करण्याचे काम शिकून घेतले. तो व्यवसाय त्या सासरीसुद्धा करीत होत्या. त्यानंतर एम्ब्रांयडरी व कुशन वर्क, मंगळसूत्र आदीचे प्रशिक्षण घेतले. तिरोडा येथील नातेवाईकांकडून त्यांना स्वयं सहायता समुहाची शक्ती समजली. त्यामुळे त्यांनी गंगाझरी येथे आपल्या गावी १२ महिलांचा समूह तयार केला.सर्वांना प्रशिक्षण दिले.या व्यवसायामुळे त्यांचा समुह सुरळीत सुरू आहे. आता त्या दुसऱ्या गावातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी जातात. समुहाने घेतलेल्या भरारीसाठी त्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे आभार मानतात.