सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

By admin | Published: October 11, 2016 12:41 AM2016-10-11T00:41:54+5:302016-10-11T00:41:54+5:30

सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक

Announce the drought in Salekasa taluka | सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

सालेकसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

Next

कहाली ग्रामपंचायतचा ठराव : परतीच्या पावसामुळे धानाला फुटले कोंब
सोनपुरी : सालेकसा तालुक्यात मागील १० दिवसांपासून परतीच्या पावसाचे आगमन होत आहे. याशिवाय यावर्षी अनेक वेळा अतिवृष्टीही झाली. सध्याच्या पावसामुळे तर धानाला कोंब फुटत असून शेतकऱ्यांच्या हाती किती धान लागेल याबाबत शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. कहाली ग्रामपंचायतने तसा ठरावही घेतला.
कहालीसह परिसरातील अनेक गावात गेल्या १० दिवसांपासून पावसाच्या सरी येत आहेत. त्यामुळे धानाचे अतोनात नुकसान झाले आहे. हलक्या जातीचे धान कापण्याच्या स्थितीमध्ये आहे. पण सतत पावसात राहून धानाला कोंब फुटले आहे. बांधीत पाणी साचल्याने धान कापणीला अडथडे निर्माण होत आहे. अशा स्थितीत कापणी करायची कशी? असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे.
कहाली ग्राम पंचायत येथे सरपंच कोतिका दसाराम मोहारे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करुन धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन शासन स्तरावर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा ठराव घेण्यात आला.
यावेळी उपसरपंच अर्चना संजय शहारे, ग्रा.पं.सदस्य घनश्याम मोहारे, झनकलाल उपराडे, प्रितम बनोठे, रामचंद सुलाखे, विमला सुलाखे, सरिता देवराज मरस्कोल्हे, महेश्वरी ठरकेले, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबूलाल मडावी, ग्रामसेवक राठोड उपस्थित होते. यावेळी सालेकसा तालुका व कहाली गावाला ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली. ठराव तहसीलदार सालेकसा यांना देण्यात आला. आता जिल्हा प्रशासन यावर काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

हलक्या धानाची माती
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातही शेंडा परिसरात सतत येणाऱ्या पावसामुळे हलक्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने दखल घेऊन सर्व्हेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
या परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीेला आले आहे. भारी जातीचे धान निसव्यावरच लोटले आहे. हलक्या धानाची कापणीही काही शेतकऱ्यांनी केली, परंतु सतत येणाऱ्या पावसामुळे धानाच्या कड्या पाण्यात बुडून धानाला अंकूर फुटले आहे. त्यामुळे धान मातीमोल झाले आहे.
या परिसरातील शेंडा, कोयलारी, कोहलीपार, मरसरामटोला, आबझारीटोला, मोहघाटा, प्रधानटोला, पांढरवाणी, उशीखेडा व कन्हारपायली येथील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या सिंचनाच्या सोयी आहेत. त्यामुळे निसर्गावर अवलंबून न राहता मृग नक्षत्रात पऱ्हे टाकून लवकरच रोवणी आटोपतात. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात हलके धान कापणीला येते. सध्या सर्वच शेतकऱ्यांचे हलके धान कापणीला आले आहे. काहींनी कापूनही टाकले. अशातच सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचा घात केला.कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळाच्या झळा सहन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाची भिती निर्माण झाली नाही. त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे. या क्षेत्रातून निवडून आलेले भाजपचे खासदार अडीच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही या क्षेत्राकडे ढुंकून पहायला तयार नाही. पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आहे, त्यांनी तरी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घ्याव्या अशी अपेक्षा केली जात आहे.सौंदड परिसरातही फुटाळा शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कापणीला आलेला धान जमीनदोस्त झाल्याने जागीच धान पीक राहण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. (वार्ताहर)

Web Title: Announce the drought in Salekasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.