आणखी एका रूग्णाचा कोरोनाने घेतला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:57+5:302021-03-04T04:54:57+5:30
गोंदिया : जिल्हयात कोरोना नियंत्रणात असल्याचे बोलले जात असतानाच दररोज बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच मंगळवारी (दि.२) कोरोनाने ...
गोंदिया : जिल्हयात कोरोना नियंत्रणात असल्याचे बोलले जात असतानाच दररोज बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच मंगळवारी (दि.२) कोरोनाने आणखी एका रूग्णाचा जीव घेतल्याने धडकी वाढली आहे. यानंतर आता जिल्हयातील मृतांची संख्या १८६ झाली आहे तर १३ बाधितांची भर पडली असून ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे जिल्हयातील बाधितांची संख्या १४४५६ झाली असून १४१२९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता जिल्हयात १४१ क्रियाशील रूग्ण आहेत.
जिल्हयात मंगळवारी आढळलेल्या १३ नवीन बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील १०, गोरेगाव १, सडक-अर्जुनी १ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १ रूग्ण आहे तर कोरोनावर मात करणाऱ्या ५ रूग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातीलच ५ रूग्ण आहेत. जिल्हयात अन्य जिल्हयांच्या तुलनेत दररोजची बाधितांची संख्या नक्कीच कमी आहे. मात्र वाढत चाललेली रूग्ण संख्या व त्यातल्या त्यात मृतांची आकडेवारी वाढत असल्याने ही बाब नक्कीच गंभीर आहे. जिल्हयात आतापर्यंत १८६ रूग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. त्यात ही आकडेवारी हळूवारपणे वाढतच चालली आहे. तालुकानिहाय बघितल्यास, गोंदिया तालुक्यात १०४, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ११ तर इतर राज्य व जिल्हयातील १० रूग्णांचा समावेश आहे.
--------------------
जिल्हयात आता १४१ क्रियाशील रूग्ण
जिल्हयात आता १४१ क्रियाशील रूग्ण उरले असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ११०, तिरोडा ४, गोरेगाव ३, आमगाव २, सालेकसा २, सडक-अर्जुनी ३, अर्जुनी-मोरगाव १२ तर इतर राज्य व जिल्हयातील ५ रूग्ण आहेत. यातील ८२ रूग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ६९, तिरोडा २, गोरेगाव २, सडक-अर्जुनी २ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २ रूग्ण आहेत.
-------------------------
आतापर्यंत १३९७८० कोरोना चाचण्या
जिल्हयात आतापर्यंत १३९७८० कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ७१०८७ आरटी-पीसीआर चाचण्या असून यातील ८५४१ पॉझिटिव्ह तर ५९२६० निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ६८६९३ रॅपिड ॲंटीजन चाचण्या असून यातील ६२०६ पॉझिटिव्ह तर ६२४८७ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. जिल्हयात व्दिगुणित गती ३८०.२ दिवस तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७३ टक्के नोंदविण्यात आले शिवाय मृत्यू दर १.२० टक्के नोंदविण्यात आला आहे.