आणखी एका गर्भवतीचा मृत्यू
By admin | Published: May 20, 2017 01:49 AM2017-05-20T01:49:51+5:302017-05-20T01:49:51+5:30
गोंदिया जिल्हा बालमृत्यू व मातामृत्यूने धगधगत आहे. आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे.
आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू : गंगाबाईत अडीच तास थांबूनही उपचार नाही
गोंदिया : गोंदिया जिल्हा बालमृत्यू व मातामृत्यूने धगधगत आहे. आठवड्याभरात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे. दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या नवेगाव उपकेंद्रातील मुसनीटोला येथील एका गर्भवतीचा आज (दि.१९) पहाटे १.३० वाजता जिल्ह्यात उपचार न झाल्याने उपचारासाठी नागपूरला जाताना रस्त्यातच मृत्यू झाला.
चंद्रकला अनिल बनोटे रा. मुसनीटोला असे मृत महिलेचे नाव आहे. ती दुसऱ्यावेळी प्रसुतीसाठी गुरुवारी उपकेंद्र नवेगाव येथे तिच्या बाळाला ठोके येत होते. तेथील परिचारीकेने प्रसुतीसाठी चंद्रकलाला बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तिला रात्री ११ वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात आणले. परंतु येथील डॉक्टरांनी तिची प्रसुती न करता टाळाटाळ केली. रात्री ११ वाजता आलेल्या गर्भवतीची प्रसुती व्हावी यासाठी कसलेही प्रयत्न न करता रात्री दीड वाजता तिची प्रकृती नाजूक सांगून नागपूरला रेफर करण्यात आले. गंगाबाईमधील १०८ या रुग्ण वाहिकेने नागपूरला रवाना करण्यात आले. सदर महिलेची गर्भपिशवी फाटल्यामुळे ती शॉकमध्ये गेली परिणामी तिला रेफर करण्यात आल्याचे गंगाबाईतील डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र गर्भवती महिलेची प्रसुती झालीच नाही तर तिची गर्भपिशवी फाटली हे डॉक्टरांना कसे समजले हा ही प्रश्न विचार करायला भाग पाडतो. रात्री ११ वाजता आलेल्या गर्भवतीवर तब्बल अडीच तास वाया घालवूनही उपचार होत नाही. अखेर तिची प्रसुती न करता गर्भाची पिशवी फाटल्याचे कारण सांगून नागपूरला रवाना करण्यात आले. गोंदिया ते नागपूर हे अंतर कापण्यासाठी तब्बल चार तास लागतात. या वेळात त्या गर्भवतीचा मृत्यू होऊ शकतो हे डॉक्टरांना माहित असताना डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता कोणत्या आधारावर रेफर केले. गर्भाची पिशवी फाटली तर शस्त्रक्रियेनंतर गर्भाची पिशवी काढून टाकली असता रुग्ण महिलेचा जीव वाचला असता. परंतु डॉक्टरांनी याकडे लक्ष न देता सरसकट तिला रेफर केले. गोंदियावरुन निघालेल्या चंद्रकलाचा पहाटे १.३० वाजता रस्त्यातच मृत्यू झाला. परिणामी नातेवाईकांनी तिला घरी नेले. या आठवड्यात तीन गर्भवतींचा मृत्यू झाला आहे.
एका चुकीमुळे बाळाचाही मृत्यू
गर्भाची पिशवी फाटली असे गंगाबाईतील डॉक्टरांचे म्हणणे होते. तर ती पिशवी काढून त्या महिलेचा जीव वाचविता आला असता. तिला नागपूरला नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यावेळी वेळीच शस्त्रक्रिया करुन बाळाला वाचविता आले असते. परंतु यासंदर्भात गोंदियातील डॉक्टरांनी पाऊल उचलले नाही किंवा १०८ वर असलेल्या डॉक्टरांनी सल्ला दिला नाही. गंगाबाईतील डॉक्टरांच्या चुकीमुळे या महिलेचा मृत्यू झाल्याची ओरड आहे.
डॉक्टर बिनधास्त
दवनीवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नवेगाव उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मुसलीटोला येथील चंद्रकला अनिल बनोटे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. तरी देखील या संदर्भात दवनीवाडा येथील डॉक्टर खरबडे संवेदनशील दिसून आले नाही. या घटनेची माहिती घेण्यासाठी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. चांदेकर यांनी त्यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. अनेकदा फोन करुनही उत्तर न मिळाल्याने दुसऱ्याच्या मोबाईलवरुन फोन केला असता तो फोन त्यांनी रिसिव्ह केला. फोन न उचलण्याचे कारण विचारले असता मी झोपला होतो असे त्यांनी सांगितले. त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गर्भवती महिलेचा मृत्यू होतो आणि ते झोपा काढतात ही बाब त्यांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी आहे.