APMC Election Result: गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘परिवर्तन’; ‘नवा गडी-नवा राज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 09:21 PM2023-04-29T21:21:59+5:302023-04-29T21:22:45+5:30

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील सर्वांत मोठी व सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत ‘परिवर्तन’ आणले आहे.

APMC Election Result: | APMC Election Result: गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘परिवर्तन’; ‘नवा गडी-नवा राज’

APMC Election Result: गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत ‘परिवर्तन’; ‘नवा गडी-नवा राज’

googlenewsNext

गोंदिया : जिल्ह्यातील सर्वांत मोठी व सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत ‘परिवर्तन’ आणले आहे. बाजार समितीतील विद्यमानांना धक्का देत बाजार समितीवर चाबी संघटन व काँग्रेस प्रणीत परिवर्तन पॅनलने एकहाती सत्ता मिळविली आहे. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे १४, सहकार पॅनलचे तीन, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा एक उमेदवार निवडून आला आहे.

 बाजार समितीत आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटन व काँग्रेस पक्ष प्रणीत परिवर्तन पॅनल, तर भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत सहकार पॅनलमध्ये चांगलीच टक्कर होती. बाजार समितीवर माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे बंधू सुरेश अग्रवाल यांचे वर्चस्व असल्याने यंदा विद्यमान आमदार विरुद्ध माजी आमदार असा संघर्ष असल्याने सर्वांच्या नजरा येथील निवडणुकीकडे लागून होत्या. अशात येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (दि.२८) मतदान घेण्यात आले व शनिवारी (दि.२९) निकाल जाहीर करण्यात आला. यात परिवर्तन पॅनलचे १४ उमेदवार निवडून आले असून पॅनलने प्रस्थापितांना धक्का देत बाजार समितीवर कब्जा केला आहे. निवडणुकीत सहकार पॅनलला फक्त तीनच जागांवर, तर शिवसेना उद्धव गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीत यांनी मारली बाजी

- निवडणुकीत सेवा सहकारी सर्वसाधारण गटातून परिवर्तन पॅनलचे उमेदवार राजीव ठकरेले, राजकुमार पटले, ओमेश्वर चौधरी, धनंजय तुरकर, चेतन बहेकार, भाऊराव उके, राधाकृष्ण ठाकूर, महिला गटातून कौशल तुरकर, शामकला पाचे, इतर मागासवर्गीय गटातून जितेश टेंभरे, तर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून शिवसेना उद्धव गटाचे पंकज यादव निवडून आले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण गटातून परिवर्तन पॅनलचे मुनेश रहांगडाले, मुरलीधर नागपुरे, अनु. जाती-जमाती गटातून परिवर्तन पॅनलचे अरुण गजभिये निवडून आले. अडते-व्यापारी गटातून सहकार पॅनलचे सुरेश अग्रवाल व सुमित भालोटिया निवडून आलेल तर हमाल-मापाडी गटातून परिवर्तन पॅनलचे विजय उके निवडून आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातून सहकार पॅनलचे धनलाल ठाकरे अविरोध निवडून आले आहेत.

सभापतींना धक्का, तर उपसभापतींची एंट्री

- येथील बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन पॅनलला स्पष्टपणे समर्थन देत प्रस्थापितांना बाजूला केले आहे. तेथेच विद्यमान सभापती चुन्नीलाल बेंद्रे यांना धक्का दिला आहे, तर उपसभापती धनलाल ठाकरे अविरोध निवडून आल्याने त्यांना एंट्री मिळाली आहे.

१२ वर्षांचे साम्राज्य गेले हातून

- बाजार समितीची यापूर्वी सन २०१२ मध्ये निवडणूक झाली होती व तेव्हापासून बाजार समितीवर सहकार पॅनलचे वर्चस्व होते. यामुळे बाजार समितीत सुरेश अग्रवाल यांचाच बोलबाला होता. त्यानंतर आता ही निवडणूक घेण्यात आली असून यामध्ये मात्र पूर्णपणे सत्ता बदल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, सुरेश अग्रवाल यांच्या सहकार पॅनलमधून फक्त तीनच जागा निवडून आल्या आहेत. म्हणूनच १२ वर्षांपासून असलेले साम्राज्य त्यांच्या हातून गेले असे म्हटले जात आहे.

Web Title: APMC Election Result:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.