शेंड्यातील दारू दुकानाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Published: May 22, 2016 01:37 AM2016-05-22T01:37:54+5:302016-05-22T01:37:54+5:30
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान अनधिकृत बांधकाम करुन स्थानांतरीत करण्याचा खटाटोप सुरू आहे.
अनाधिकृत बांधकाम : पं.स. सदस्य व महिलांचा आरोप
शेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथे परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान अनधिकृत बांधकाम करुन स्थानांतरीत करण्याचा खटाटोप सुरू आहे. त्याला परवानगी देण्यात येवू नये, अशा आशयाचे निवेदन पं.स. सदस्य गीता टेंभरे व महिलांनी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना दिले आहे.
सविस्तर असे की, या गावात सन २००८ पासून परवानाधारक देशी दारु दुकान रवि मेरुगवार यांच्या घरी होते. परवानाधारकाने सदर दुकान चालविण्याचा नोकरनामा मेरुगवार यांच्या नावे केला होता. परवाना धारकाचे निधन झाल्यामुळे सदर परवाना पत्नी इंदू लिचडे यांच्या नावाने वर्ग करण्यात आला. परवानाधारक व मेरुगवार यांच्यात बिनसल्यामुळे दुकानाचे दस्तावेज आपल्या ताब्यात घेवून दुकान चालवण्याची तयारी केली. परंतु रवि मेरुगवार यांनी घर देण्यास नकार देवून जेसीबीने ते घर पाडले. त्यामुळे १ एप्रिलपासून देशी दारुचे दुकान बंद आहे.
सध्या गावातील गट क्र. १८१, सार्वजनिक चराईकरिता मुकरर ५.४७ हेक्टर (सरकारी) ग्रामपंचायत ताब्यातील जमीन असल्याचा सातबारा तक्रारकर्त्यांने निवेदनासोबत जोडला आहे. यावरून त्या जागेवरील बांधकाम अनधिकृत आहे हे सिद्ध होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र देशी दारु नियम १९७३ नियम २५ (५) नुसार दुकान स्थानांतरीत करण्यासाठी अधिकृत जागा असावी, अथवा सक्षम स्थानिक प्राधिकाऱ्याचा दाखला असावा. तसे काही नसताना उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांशी संगणमत करुन देशी दारू दुकान स्थानांतरीत करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला परवानगी देण्यात येवू नये, असे पं.स. सदस्य गीता टेंभरे व महिलांनी स्वाक्षऱ्यानिशी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना लेखी निवेदनातून सादर केले आहे. (वार्ताहर)