३५० शेतकऱ्यांचे विमा कंपनीकडे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:00 AM2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:04+5:30
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील ७० हजारावर शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढला होता. जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीचा पावसाचा फटका धान पिकांना बसला. त्यामुळे जिल्ह्यातील ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्या कुठल्या निकषाच्या आधारावर नुकसान भरपाई देते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात एकूण १ लाख ९६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. काही शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हा धान दिवाळी दरम्यान निघत असल्याने शेतकऱ्यांना धानाची विक्री करुन दिवाळी साजरी करण्यास आणि उधार उसणवारी फेडण्यास मदत होते. हलका धान दिवाळीपूर्वीच निसविल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी केली होती. त्यामुळे कापणी केलेला धान तसाच बांध्यामध्ये पडून होता. मात्र मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस जोरदार बरसला. तर दोन दिवस पाऊस झाल्याने कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्या. परिणामी दोन तीन दिवस बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने काही धानाला अंकुर फुटले तर मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला. जवळपास ३ हजार हेक्टरमधील पिके अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शासनाच्या निर्देशानंतर कृषी, महसूल आणि विमा कंपन्यांनी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे तयार करण्यास सुरूवात केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले असल्यास विमा कंपनीकडे अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यानंतरच विमा कंपनी नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देते. त्यामुळे आत्तापर्यंत नुकसान झालेल्या ३५० शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे अर्ज केले आहे.
विमा कंपनीने प्रत्येक तालुकास्तरावर एका प्रतिनिधीची नियुक्ती केली असून जिल्हास्तरावर समन्वयकाची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे पीक विमाधारक शेतकºयांनी अर्ज करणे आवश्यक आहे.अन्यथा त्यांना नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
नुकसान भरपाईसाठी ३३ टक्केची अट
पीक विमा कंपनी आणि शासनाच्या नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. त्याच शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे हेच शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरणार आहेत.
कृषी व महसूल विभाग लागला कामाला
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन गाव निहाय याद्या तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. या अंतर्गत कृषी आणि महसूल विभागाने पंचनामे करण्यास सुरूवात केली आहे. या नुकसानीचा अहवाल शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केला जात आहे. ही प्रक्रिया पुन्हा किमान आठ दिवस चालणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांसाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले
जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मागणी लावून धरल्याचे चित्र आहे.
पाखड धान ११०० रुपये प्रतिक्विंटल
कापणी केलेले धान मोठ्या प्रमाणात भिजल्याने ते पाखड झाले. शेतकरी हे धान बाजारपेठेत विक्रीस नेत असून व्यापारी त्याची पडत्या दराने खरेदी करीत आहे. सध्या पाखड झालेला धान ११०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपयांचा फटका बसत आहे.
धान खरेदी केंद्राचे भिजत घोंगडे कायम
दिवाळी लोटत असली तरी अद्याप जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत आहे. शासकीय धान खरेदी केंद्र केव्हा सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितेचे चित्र आहे.