वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींना कामाचे आठ तास लागू करा
By Admin | Published: May 27, 2016 01:41 AM2016-05-27T01:41:04+5:302016-05-27T01:41:04+5:30
वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींसाठी कामाचे आठ तास निश्चित करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.
संघटनेची निदर्शने : मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे आंदोलन
गोंदिया : वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींसाठी कामाचे आठ तास निश्चित करण्यासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. सन २०१४ मध्ये शासनाने त्यांच्या कामाचे १० तास निश्चित केल्याने एमएसएमआरए (महाराष्ट्र सेल्स अॅन्ड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ए असोसिएशन) या संघटनेने आक्षेप घेवून अधिसूचनेत सुधारणा करण्याची मागणी राज्य कामगारमंत्र्यांकडे केली. त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे गुरूवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.
सन २००७ पासून संघटनेच्या नेतृत्वात वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींसाठी (एम.आर.) कामाची वेळ आठ तास निश्चित करण्यासाठी सातत्याने संघर्ष सुरू होता. सततच्या या आंदोलनामुळे तसेच राज्य शासनासोबत झालेल्या बैठकानंतर १५ जानेवारी २०१४ रोजी राज्य शासनाचे एक अधिसूचना जाहीर केली. या अधिसूचनेमुळे वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींच्या कामाचे आठ तासांऐवजी १० तास करण्यात आले. संघटनेने यावर आक्षेप घेवून अधिसूचनेत सुधारणा करण्याची मागणी राज्य कामगार मंत्र्यांकडे केली. त्यात सुधारणा करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले. त्यानंतर नवीन राज्य सरकार आले. पण आजपावेतो सरकारने मागण्यांकडे दुर्लक्षच केले.
राज्य शासनाविरूद्ध गुरूवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, रॅली व निदर्शने करण्यात आली. यात अनेक वैद्यकीय व विक्री प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात आठ तासांच्या कामाच्या सुधारित वेळेबाबत अधिसूचना जारी करण्यासोबतच इतर चार मागण्यांचा समावेश होता. यावेळी संघटनेचे सचिव प्रल्हाद सार्वे, राज्यस्तर सदस्य निशांत मिश्रा, इतर सदस्य राजेश ब्राह्मणकर, योगेश नागवंशी, क्रिष्णा चौरागडे, एच.आर. रोकडे, दिनेश मिश्रा, विकास व्यास, व्यंकट यामलवार आदी अनेक जण उपस्थित होते.