सावरी येथे स्थायी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:46+5:302021-09-24T04:33:46+5:30
गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावरी ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचे स्थानांतरण होऊन ७ ते ८ वर्षांचा कार्यकाळ ...
गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सावरी ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकाऱ्याचे स्थानांतरण होऊन ७ ते ८ वर्षांचा कार्यकाळ लोटला आहे. पण अद्यापही याठिकाणी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची विविध कामे खोळंबली आहेत. त्यामुळे हे रिक्त पद त्वरित भरण्याची मागणी कार्तिक बिसेन व गावकऱ्यांनी केली आहे.
ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात अनेक विकासाची कामे केली जातात. तर गावकरी, विद्यार्थी यांना सुद्धा आवश्यक दाखले हे ग्रामपंचायत मधूनच मिळतात. मात्र मागील सात ते आठ वर्षांपासून याठिकाणी ग्रामविकास अधिकारी नसल्याने विद्यार्थी व गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. यामुळे कामे अनेक सुद्धा खोळंबली आहेत. या परिसरातील ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून याठिकाणी ग्रामविकास अधिकारी नसल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या अडचणींची दखल घेत ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भातील मागणीचे निवेदन सुद्धा जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.
............