आता ७ वाजेपर्यंत बांधावर निविष्ठा वाटपास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:29 AM2021-05-21T04:29:45+5:302021-05-21T04:29:45+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच ...
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठा केंद्र चालू ठेवण्याबाबत तसेच कृषी साहित्याच्या अडथळारहित पुरवठ्याबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सर्वप्रकारची कृषी सेवा केंद्रे, कृषीसंबंधित साहित्य-अवजारे विक्री केंद्र, बी- बियाणे, कीटकनाशके, खते विक्री केंद्र व कृषी संबंधित असलेली सर्वप्रकारची प्रतिष्ठाने यांना यापुढे सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्ये तसेच त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत बांधावर निविष्ठा वाटपास व या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने विक्री करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
यासाठी मात्र याठिकाणी काम करणाऱ्या सर्व कामगार-कर्मचाऱ्यांना कोविडची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. सर्वप्रकारची कृषी उत्पादने व साहित्याचा पुरवठा हा नियमितपणे चालू राहील. तसेच कृषीसंबंधित साहित्य व उत्पादनांच्या मालवाहतुकीकरिता निर्बंध लागू असणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी लॉकडाऊन जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत लागू राहील. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता समूहाने शेतकऱ्यांची मागणी घेऊन त्या समूहापैकी एकाच शेतकऱ्याने विक्री केंद्रावर जाऊन सर्वांसाठी खते-बियाणे विकत घेऊन बांधावर पोहोच करण्याची मोहीम कृषी विभागाच्या समन्वयाने राबवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी कळविले आहे.