पालांदूर, गोर्रे आरोग्य केंद्राच्या पदभरतीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:33+5:302021-06-11T04:20:33+5:30
देवरी : तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रात आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता पालांदूर (जमी.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सालेकसा ...
देवरी : तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रात आरोग्य सेवा बळकट करण्याकरिता पालांदूर (जमी.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व सालेकसा तालुक्यातील गोर्रे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने या दोन्ही ठिकाणी नवीन पदभरती करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा सुरळीत करण्यास मदत होणार आहे.
पालांदूर (जमी.) व गोर्रे या दोन्ही ठिकाणी आरोग्य केंद्राची आधुनिक, तांत्रिकदृष्ट्या सोयी-सुविधेने सुसज्ज इमारत अनेक दिवसांपासून सज्ज आहे. मात्र या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने रुग्ण आरोग्य सेवेपासून वंचित होते. या विषयाला गांभीर्याने घेत आ. सहषराम कोरोटे यांनी सतत शासनस्तरावर आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या आरोग्य केंद्रात नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. पालांदूर (जमी.) व गोर्रे या दोन्ही आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, औषधी निर्माता व परिचर अशा अत्यावश्यक पदाच्या भरतीचे मार्ग सुकर झाले आहे. आरोग्य सेवेतील विस्ताराचा लाभ या क्षेत्रातील हजारो लोकांना होणार आहे.