जलस्यांनी जपला प्रबोधनाचा वारसा
By admin | Published: November 20, 2015 02:13 AM2015-11-20T02:13:53+5:302015-11-20T02:13:53+5:30
सांस्कृतिक रुढीचा वारसा झाडीपट्टीत सदैव जपण्यात आला. जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या मंडईच्या पर्वात लावणी, तमाशा,
परंपरा कायम : लावणी, तमाशा, दंडार व नाटकातून महापुरूषांच्या विचारांचा प्रसार
बाराभाटी : सांस्कृतिक रुढीचा वारसा झाडीपट्टीत सदैव जपण्यात आला. जिल्ह्यात दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या मंडईच्या पर्वात लावणी, तमाशा, दंडार व नाटकातून पुरातन काळापासून प्रबोधन केले जाते. गावोगावी जलस्यांचे आयोजन करून सदर माध्यमातून महापुरूषांचे विचारही पसरविण्याचे कार्य केले जात आहे.
अनेक वर्षापासून आपल्या विदर्भात वामनदादा कर्डक यांच्यापासून सुरूवात जलसा आयोजनाला सुरूवात झाली आणि आताही जलसे सुरूच आहेत. जलसाकरांनी विविध माध्यमातून प्रबोधनाचा वसा सोडलाच नाही. सुजलाल सुफलाम असणाऱ्या विदर्भासह आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जलसाकार, कवी, प्रबोधनकार, वक्ते होऊन गेले. यामध्ये भीमशाहीर विठ्ठल उमप, लोककवी व प्रबोधनकार वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, दया पवार, बाबुराव बागुल, रमेश काका कोतवाल, नामदेव ढसाळ यांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांचा वारसा चालविण्यासाठी विदर्भातील सुप्रसिध्द कव्वालीकार शिंदे घराणा, आंबेडकरी प्रबोधनकार अनिरूध्द वनकर, अनिरूध्द शेवाळे, राहुल अन्वाकर, प्रबोधनाचा अंकुर जोपासणारे संगम नंदागवळी, कैलास बोरकर, सुलभा खोब्रागडे, मनोज कोटांगले, अविनाश मेश्राम, लालचंद मारगाये असे बरेच तळागळातील प्रबोधनकार आहेत.
ग्रामीण भागातील वृद्धापासून तर तरुण मंडळींनी मनात वामनदादा कर्डक यांच्या आठवणींना उजाळा देत जलसांची परंपरा कायम जपली आहे. बहुजन समाजात जगणाऱ्या सर्वपक्षीय लोकांसाठी अभिमानाची ही बाब आहे. याचमुळे जलसाकरांनी हा वसा सोडला नाही. तसेच हा वसा आम्ही सोडू शकत नाही, असे हे जलसाकार, प्रबोधनकार सांगत आहेत.
जलसा सादर करताना महापुरुषांचे विचार, आचार, शिकवण, त्यांचे महान कार्य, सामाजिक भावनेची जाणीव तसेच यामधून मिळणारा मानसन्मान, आदरभाव यामुळे समाजापुढे एक वेगळीच प्रतिमा निर्माण करतात. यामध्ये ‘आम्ही तुफानातले दिवे, वादळवारा, सांगा धनाचा बिरला बाटा, भ भटजीचा नाही, भ भीमरावाचा, मायेची सावली, रमाई, मग पाहिजे कशाला बा भीम, जन्म घे तू बा भीमा, क्रांतीचा वादळ, निळ्या पाखरांची माय, वाळलेली काडी एक, मला चिड येत नाही हाच माझा गुन्हा, अशा अनेक सुप्रसिद्ध गीतांनी आजच्या काळामध्ये संपूर्ण विदर्भ, महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातसुद्धा या जलसाकारांनी धूम केली आहे. मंडईच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यात आणखी त्यांची धूम सुरू आहे.
या जलशामुळे अनेक कवी , प्रबोधनका, कलावंत व गायक यांना मानसन्मानासह मानधनही मिळते. त्यामुळे बेरोजगारीच्या काळात पोटाच्या खळगीचा प्रश्न सुटत आहे. हे जलसे महापुरुषांच्या जयंत्या, अनावरण सोहळे, सामाजिक कार्यक्रम, प्रबोधनात्मक विचार मंचाचे अनेक समारंभ सोहळ्यादरम्यान सादर करून अत्यंत आनंदाने हा जलसाकार वसा जपत असल्याचे काही जलसाकारांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)