पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

By नरेश रहिले | Published: October 30, 2023 05:58 PM2023-10-30T17:58:48+5:302023-10-30T17:59:34+5:30

घरच्यांना पत्ता लागू नये म्हणून मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकला

Argued at a party, drank too much and strangled a friend | पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

पार्टीत वादावादी, खूप दारू पाजून मित्राचा गळा घोटून खून

गोंदिया : पार्टी करताना झालेल्या वाद-विवादात मित्राला खूप दारू पाजून त्याचा खून करण्यात आला. त्याचा पत्ता घरच्यांना लागू नये म्हणून त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोह येथे फेकून देण्यात आला. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. राकेश सुकचरण उईके (३८, रा. पिपरिया, ता. सालेकसा) असे मृताचे नाव आहे. या घटनेसंदर्भात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली नाही. आमगावसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गोंदिया पोलिस कारवाई करताना सतर्कता बाळगत आहेत.

सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिपरिया येथील आरोपी प्रकाश चमरूलाल भौतिक (४०), मृतक राकेश सुकचरण उईके (३८) व गावातीलच अन्य दोन असे चार जण १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता गावातीलच जंगलात पार्टी करायला गेले. मद्यप्राशन करून त्यांनी मटण पार्टी केली. मृतक राकेश उईके याचा आरोपीने गळा आवळून खून केला.

चौघाही मित्रांनी दारू प्यायल्यावर पार्टी केली. त्यानंतर तिघेही परत गावाकडे आले. मृत व्यक्तीने अति प्रमाणात मद्यप्राशन केले असल्याने तो पार्टी करण्याच्या ठिकाणीच पडून होता. घराकडे माघारी आलेल्या आरोपीने परत जाऊन सालेकसा तालुक्याच्या गल्लाटोला येथील तिलक उपराडे यांच्या शेतात त्याचा गळा आवळून खून केला. २० ऑक्टोबर रोजी छोटी बाघनदी पात्रातील राणीडोहाच्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळून आला. यासंदर्भात मृतकची पत्नी बबीता राकेश उईके (३५, रा. पिपरिया) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक अरविंद राऊत तपास करीत आहेत.

बेपत्ताची नोंदही नव्हती

१७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या राकेश सुकचरण उईके (३८) याच्या बेपत्ताची तक्रार घरच्यांनी पोलिसात केली नव्हती. १७ ऑक्टोबर रोजी पार्टी करण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या राकेशचा मृतदेह चौथ्या दिवशी आढळला. त्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसात खुनाची तक्रार केली आहे.

पार्टी करायला गेलेल्या लोकांनी घरच्यांना का माहिती दिली नाही?

राकेश उईकेसोबत पार्टी करायला आरोपीसह तीन लोक असे एकूण चौघे गेले होते. परंतु, राकेश घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोधाशोध करून विचारपूस सुरू केली. परंतु, त्याच्यासोबत पार्टी करायला गेलेल्या तिन्ही लोकांनी कसलीही माहिती दिली नाही. एकानेच खून केला. परंतु, दोघांनी या घटनेची माहिती घरच्यांना का दिली नाही. या प्रकरणात खूप काही दडले असल्याचा संशय येतो.

पुरावा नष्ट करण्यासाठी टाकले नदीत

राकेश उईके याचा दोराने गळा आवळून खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नष्ट व्हावा, माशांनी खावा, यासाठी त्याचा मृतदेह छोट्या बाघनदीच्या राणीडोहाच्या पाण्यात टाकण्यात आला. परंतु, त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तीन दिवसांनंतर मिळाला. मृतदेह मिळाल्यानंतर हळूहळू गावात या घटनेची सत्यता पुढे आली. यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार केली.

नेमके काय दडवले जाते

या घटनेत चांगलीच चुरस येणार आहे. या खुनामागील खरे कारण काय हेदेखील आतापर्यंत पुढे आले नाही. तपासाचा भाग म्हणून पोलिस टाळतात. या घटनेतील लोकांनी काय माहिती दिली, आरोपीला अटक केेलेली नाही. यामुळे गावात असंतोषाचे वातावरण आहे. मृतक आणि आरोपी हे दोघेही मित्र असल्याने मित्रत्त्वात खून होण्यासारखे एवढे मोठे कारण कोणते, याचा तपास होणे गरजेचे आहे.

Web Title: Argued at a party, drank too much and strangled a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.