साधता संवाद संपतो वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:34 AM2021-09-24T04:34:32+5:302021-09-24T04:34:32+5:30
सडक अर्जुनी : मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुुसार २५ सप्टेंबर रोजी दिवाणी ...
सडक अर्जुनी : मुंबई उच्च न्यायालय व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुुसार २५ सप्टेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘साधता संवाद संपतो वाद’ या उक्तीप्रमाणे नागरिकांनी या लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ट स्तर विक्रम आव्हाड यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय लोकन्यायालयात प्रलंबित असलेले सर्व दिवाणी स्वरूपाचे दावे जसे वाटपाचा दावा, रस्त्याचा दावा, कब्जा व मालकी हक्काचा दावा, मनाई हुकुमाचा दावा, अतिक्रमणाचा दावा तसेच सर्व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ अंतर्गत येणारे अर्ज, पराक्रम्य संलेख अधिनियम कलम १३८ अन्वये दाखल प्रकरणे, उदरनिर्वाह भत्ता अर्ज तसेच विविध बँक, म.रा.वि.म. ग्रामपंचायत, नगर पंचायतीचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत.
‘न्याय सर्वांसाठी’ या अभियानांतर्गत लोकन्यायालयात दोन्ही बाजूंच्या पक्षकारांना आपापली बाजू मांडण्याची संधी मिळणार असून, सामोपचाराने प्रकरणे मिटविली जाणार आहेत. जास्तीतजास्त प्रकरणांचा जलद गतीने निपटारा या लोकन्यायालयाच्या माध्यमातून केला जाणार आहे.