अर्जुनी मोरगाव काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी पत्रयुध्द
By admin | Published: August 17, 2014 11:16 PM2014-08-17T23:16:01+5:302014-08-17T23:16:01+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र आणा व अध्यक्षपदी विराजमान व्हा, असा प्रकार येथे सुरू आहे. अशा पत्रांना घेऊन येथे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून पत्र आणा व अध्यक्षपदी विराजमान व्हा, असा प्रकार येथे सुरू आहे. अशा पत्रांना घेऊन येथे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचे भिजत घोंगडे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मागील काळात नितीन पुगलिया यांची या पदावर वर्णी लागली होती. त्यावेळी अनेक नावांची सभेत शिफारस झाली होती. मात्र एकमेकांचे पाय ओढण्याच्या पध्दतीचा लाभ पुगलिया यांना मिळाला व ते अध्यक्षपदी विराजमान झाले. त्याच्या अपघातानंतर वर्षभरापासून हे पद रिक्त होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे पत्र क्र. २८७८ दि.२७ जून २०१४ नुसार प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या सूचनेप्रमाणे शामकांत विठ्ठलराव नेवारे यांची अर्जुनी/मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र सरचिटणीस अॅड.गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले. या नियुक्तीपत्राची एक प्रत आ.रामरतन राऊत यांना देण्यात आले. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पत्र क्र. ३१८२ दि. ३१ जुलै २०१४ रोजी जारी केले. यात प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार शामकांत नेवारे यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली. याऐवजी भागवत महादेव नाकाडे हे तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यकारी अध्यक्षपदी कार्यरत राहतील असे पत्र सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी काढले. महिनाभरात दोघांच्या अध्यक्षपदांचे पत्र हा येथे चर्चेचा विषय आहे.
एखादा सेलचे (शाखा) पत्र मुंबईवरून आणायचे आणि इकडे प्रसिध्दी माध्यमात आपल्या नावापुढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य अशी बिरूदावली लावण्याचा प्रकार येथे सुरू आहे. अशा परिस्थीतीत कुणीही अध्यक्ष असला तरी शक्ती प्रदर्शन होऊन गटबाजी होणे स्वाभाविक असल्याचे कार्यकर्ते सांगतात. (तालुका प्रतिनिधी)