अर्जुनीचा अमन झळकला रूपेरी पडद्यावर

By admin | Published: October 25, 2015 01:38 AM2015-10-25T01:38:01+5:302015-10-25T01:38:01+5:30

झाडीपट्टीत कलावंतांची खाण आहे. दरवर्षी या तालुक्यात शेकडो नाटकांचे सादरीकरण होते.

Arjuna's amazement is on the silver screen | अर्जुनीचा अमन झळकला रूपेरी पडद्यावर

अर्जुनीचा अमन झळकला रूपेरी पडद्यावर

Next

‘संध्या सावट’ चित्रपट : बालकलाकाराच्या भूमिकेतून रुपेरी दुनियेत ठेवले पाऊल
अर्जुनी मोरगाव : झाडीपट्टीत कलावंतांची खाण आहे. दरवर्षी या तालुक्यात शेकडो नाटकांचे सादरीकरण होते. मात्र चंदेरी दुनियेच्या रूपेरी पडद्यावर झळकण्याची संधी अद्याप या तालुक्यातून कोणाच्या वाट्याला आली नाही. मात्र येथील सामान्य कुटुंबातील अमन घनश्याम खरवडे हा बाल कलाकार त्या बाबतीत नशिबवान ठरला. ‘संध्या सावट’ या मराठी चित्रपटात तो झळकला असून गेल्या १६ आॅक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
पूर्व विदर्भात झाडीपट्टी नाट्यरंगभूमी प्रसिद्ध आहे. या रंगभूमीवर मुंबई, पुणे येथील अनेक दिग्गज नाट्य कलावंत आपल्या कलेचे सादरीकरण करतात. पूर्व विदर्भातील झाडीपट्टीला अभिनयाचा वारसा लाभला असला तरी येथील कलावंतांनी रुपेरी पडद्यावर झेप घेतली नाही. नामवंत मराठी कलावंतांना चित्रपटात भूमिका देऊन साकोली तालुक्याच्या लवारी-उमरी येथील मोरेश्वर मेश्राम यांनी ‘द लास्ट बेंचर’, ‘रेला...रे’, ‘३१ डिसेंबर रक्ताविना क्रांती’ हे तर शेखर पटले दिग्दर्शित ‘लाल चुडा’ हे चित्रपट झाडीपट्टीतून तयार झाले. भविष्यात बॉलीवूडची रुपेरी दुनिया ‘झाडीवूड’ या नावाने ओळखली जाणार, असे मत चित्रपट निर्माते मोरेश्वर मेश्राम यांनी व्यक्त केले होते. हळू हळू या निमित्ताने त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे.
अमन हा सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तो येथील सरस्वती विद्यालयात सातव्या वर्गात शिकतो. कुटुंबात कुठेही अभिनयाचा वारसा नाही. मात्र अगदी बालपणापासूनच अमनला अभिनयाची आवड आहे. त्याने यापूर्वी काही कार्यक्रमातून उत्कृष्टरित्या अभिनयाचे सादरीकरण केले. त्यातूनच चित्रपट दिग्दर्शक प्रदीपकुमार हाडगे यांचेकडून संध्या सावट या चित्रपटासाठी बाल कलाकार म्हणून अमनला अभिनय करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाच्या कथानकात व्यसनाधिन व दिशाहीन झालेल्या तरुणाईची कौटुंबिक थरारकथा आहे. हा चित्रपट शुक्रवारला लक्ष्मी टॉकीज नागपूर, प्रशांत टॉकीज सिंदेवाही (चंद्रपूर) व महावीर टॉकीज साकोली येथे प्रदर्शित झाला आहे. २३ आॅक्टोबर रोजी हा चित्रपट भंडारा, पवनी, उमरेड, पुणे, अकोला, अमरावती, या ठिकाणी प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात प्राची बहाद्दूरे, विद्या नागरे, प्रज्ञा महल्ले, रजनी मोटघरे, प्रवीण लेदे, प्रदीपकुमार हाडगे, हिटलर भिवगडे, सुनील हिरेकन, सुदीन तांबे, दीपक हरणे, तसेच बाल कलाकार म्हणून अमन खरवडे, खुशी लेदे, अभिजित आरीकर यांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे नागपूर, नवेगावबांध, उमरी लवारी, साकोली, सौंदड, शिवनीबांध व मुंबई येथे चित्रीकरण झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arjuna's amazement is on the silver screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.