अर्जुनी व गोंडमोहाडीच्या संघाने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 08:52 PM2018-01-09T20:52:16+5:302018-01-09T20:52:42+5:30
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असतानाच येथील प्रौढ कबड्डी स्पर्धेत अर्जुनी येथील तर खो-खो स्पर्धेत गोंडमोहाडी येथील संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
आॅनलाईन लोकमत
परसवाडा : बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळत असतानाच येथील प्रौढ कबड्डी स्पर्धेत अर्जुनी येथील तर खो-खो स्पर्धेत गोंडमोहाडी येथील संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान लोक संचालित साधन केंद्रांतर्गत येथील क्रीडांगणावर क्रांतीज्योती सावित्रीबाई जयंती निमित्त प्रौढ महिलांच्या क्रीडा मेळाव्यात महिलांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले.
या महिला मेळाव्यात १० गावांतील सुमारे २०० महिलांनी बचत गटामार्फत भाग घेतला होता. २० ते ५८ वर्षे वयोगटातील महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यातील कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक अर्जुनी येथील संघाने पटकाविला ंअसतानाच द्वितीय क्रमांक खैरलांजी येथील संघाने पटकाविला. खो-खो मध्ये प्रथम क्रमांक गोंडमोहाडी येथील संघाने, द्वितीय क्रमांक पिपरिया येथील संघाने पटकाविला.
कदम यांच्या अध्यक्षतेत व सरपंच मनीराम हिंगे, संचालक चतुर्भुज बिसेन, जागेश्वर निमजे, टी.जे. शहारे, हुपराज जमईवार, पोलीस पाटील कुंजीलाल भगत, दिलीप राऊत, प्राचार्य सुभाष रहांगडाले, महेंद्र भगत, चतुर तितिरमारे, सुभाष वैद्ये, जी.आर. ठाकरे यांच्या उपस्थितीत आयोजीत बक्षीस वितरण समारंभात विजेत्या संघांना पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक अरुण मिश्रा यांनी मांडले. संचालन मंदा पारधी यांनी केले. आभार सुनीता पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी माहिमचे एल.पी. गौतम, संजय कोल्हे, प्रिया पटले, नंदकिशोर रहांगडाले, शिल्पा येळे, मनोज बारेवार आदिंनी सहकार्य केले. पर्यवेक्षक म्हणून चतुर तितिरमारे, महेंद्र भगत, बाळू सोनेवाने, सुभाष वैद्ये, मेश्राम, प्रदीप कडव व सेव्हन स्टार कबड्डी क्रीडा मंडळच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
खेलनबाई उत्कृष्ट कबड्डीपटू
उत्कृष्ट महिला कबड्डी पटूचा मान खेलनबाई गेंदलाल पटले (अत्री) यांनी मिळविला. ५८ वर्षे वयातही त्यांनी दाखविलेली फुर्ती व केलेली कामगिरी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या पिढीत स्वदेशी खेळांची ओढ निर्माण व्हावी यासाठी या वयात खेळाच्या मैदानात उतरल्याचे त्यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगीतले.