कोणी गळाला लागू नये म्हणून नवनिर्वाचित संचालक देवदर्शनाला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 01:56 PM2023-05-22T13:56:51+5:302023-05-22T13:57:33+5:30
सभापती आमचाच : भाजप व महाविकास आघाडीचा दावा
बोंडगादेवी (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापक मंडळातील १८ संचालक निवडण्यासाठी २८ एप्रिल रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडून आलेल्या संचालकांमधून सभापती व उपसभापती निवडण्यासाठी मंगळवारी (दि.२३) विशेष सभा बोलविण्यात आली आहे. भाजपला नऊ व महाविकास आघाडीला नऊ अशा समसमान जागा मिळाल्या आहेत. विजयी झालेल्यापैकी काही अतिउत्साहित संचालकांना सभापतीचे डोहाळे लागले आहेत. दोन्ही गट तटस्थ असल्याने अखेरच्या क्षणी ईश्वर चिठ्ठीचा पर्याय खुला राहणार आहे. फोडाफोडी, कुरघोडीचा नाट्यमय प्रकार घडून कोणी गळाला तर लागणार नाही ना? अशी शंका निर्माण झाल्याने नवनिर्वाचित संचालक देवदर्शनाला गेले आहे.
सभापती, उपसभापतीपदाची निवडणूक मंगळवारी होत आहे. निवडणुकीने वातावरण तापले आहे. दोन्ही गटाचे शीर्षस्थ नेते आमचे संचालक आमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक आहेत असे सांगत आहे. सभापती, उपसभापती पदाचा मार्ग सुकर होऊन बाजार समितीचा मुकुट आपल्या डोक्यावर पडावा यासाठी चाचपणीसुध्दा सुरू आहे. सभापती कुणीही हो, परंतु बाजार समितीवर महाविकास आघाडीचीच सत्ता राहणार असा दावा राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. सभापती पदाचा दावा समोर ठेवून आयात संचालकांसाठी प्रयत्नाचा प्राथमिक शिरकाव झाल्याचे दिसत आहे. दोन्ही गटांनी आपल्या संचालकांना तटस्थ ठेवण्यासाठी गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे. दोन्ही गट परस्पर गळाला मासा लागल्याचे बोलल्या जाते.
असे आहेत नवनिर्वाचित संचालक
निवडून आलेल्या संचालकांमध्ये भाजप समर्थक गटाचे लायकराम भेंडारकर, रतीराम कापगते, प्रदीप मस्के, व्यंकट खोब्रागडे, काशीशजमा कुरैशी, आशा विनोद नाकाडे, शारदा गुलाब नाकाडे, वामन राऊत, नवलकिशोर चांडक या नऊ जणांचा समावेश आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) होमदान ब्राह्मणकर, राष्ट्रवादीचे लोकपाल गहाणे, यशवंत परशुरामकर, हेमकृष्ण संग्रामे, किशोर ब्राह्मणकर, काँग्रेसचे मोरेश्वर सोनवाने, अनिल दहिवले, सर्वेश भुतडा, खुशाल गेडाम या नऊ जणांचा समावेश आहे.
देवदर्शन वारी
पदाच्या मोहजालात अडकून मोहरा हाती लागू नये म्हणून नवनिर्वाचित संचालक आपल्या पाठीराख्या गटासोबत देवदर्शन वारीसाठी रविवारी गेल्याची माहिती आहे. ऐन सभेच्या वेळी सभागृहात त्याचे आगमन होणार असल्याची माहिती आहे.
सभापती, उपसभापतीचे नाव गुलदस्त्यात
दोन्ही गटाकडे पुरेसे बहुमत नसल्याने सभापती, उपसभापती पदाचे नाव व आज तरी पुढे आले नाही. वेळेवर ठरवू असा पावित्र्यात दोन्ही गट आहेत. जो कोणी एखाद्या गटाचा मुख्य पाहुण्याचा गळाला लागला तर सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली म्हणून समजा असे बोलल्या जाते.