तरुण तुर्क विरुद्ध म्हातारे अर्क, भाजपच्या अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 01:34 PM2023-05-27T13:34:57+5:302023-05-27T13:37:31+5:30
भाजपला आत्मचिंतन करण्याची वेळ : धडा घेणार का?
संतोष बुकावन
अर्जुनी मोरगाव (गोंदिया) : दोन दिवसांपूर्वी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचे पानिपत झाले. या संस्थेवर पकड असलेल्या व शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या भाजपला पराभवाची चव चाखावी लागली हे पचनी पडत नाही. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब समजावी लागेल. या पराभवातून श्रेष्ठींना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी मिशन ठरविणारे भाजप कार्यकर्ते गावगाड्याच्या निवडणुकीत कमिशनला महत्त्व देतात हे या निवडणुकीवरून अधोरेखित होत आहे. हे चित्र निश्चितच भाजपच्या दृष्टीने हितावह नाही.
सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ही अग्रणी आहे. या संस्थेवर आपल्या पक्षाची विजयी पताका फडकत राहावी हे प्रत्येक राजकीय पक्षाचे धोरण असते. पण मी - मी पणाचा आव आणत चक्क पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचे काम काही कार्यकर्ते करतात. एकापेक्षा अधिक पदांची लालसा बाळगण्याचे मनसुबे हेच अधोगतीला कारणीभूत ठरताना दिसत आहेत. अशा बाबींचा स्पष्ट खुलासा होत नसला तरी जे सच्चे कार्यकर्ते पक्षासाठी वर्षानुवर्षे सतरंज्या उचलतात त्यांना कुठेच संधी मिळत नाही.
पक्षश्रेष्ठींनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की वाड्यांवरच्या राजकारणाचा काळ केव्हाच संपला आहे. पण दुर्दैवाने आजही वाड्यावरचे राजकारण सुरूच आहे. हे राजकारण कुठेतरी संपले पाहिजे, अशी सामान्य कार्यकर्ते बंदद्वार चर्चा करताना दिसतात. ही कार्यकर्त्यांच्या अंतर्मनातील भावना व खदखद निवडणूक निमित्ताने बाहेर पडते हे जळजळीत वास्तव आहे. आता हेच बघा ना, तालुक्यात ३६ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आहेत. तब्बल २६ संस्थांवर भाजपचे प्राबल्य आहे. संस्था गटात आघाडीच्या तुलनेत भाजपची ७० मते अधिक आहेत. या गटातून ११ उमेदवार निवडायचे होते. या गटात सर्व ११ संचालक भाजपचे निवडून येणार असे भाकीत वर्तवले जात होते. मात्र या गटाला सुरुंग लावत महाविकास आघाडीने तीन संचालक निवडून आणले. हे महाविकास आघाडीच्या मेहनतीचे फळ आहे. भाजपचे वरिष्ठ नेते हे मोठ्या निवडणुकांकडे अधिक लक्ष केंद्रित करतात, लहान निवडणुकांकडे फारसे नाही असे दिसून येते.
भाजपमध्ये समन्वयाचा अभाव
भाजपमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. सभापतीपदाची निवडणूक होण्यापूर्वी भाजपने संचालकांना सहलीवर नेले. यात श्रेष्ठींनी सभापतीपद ठरवून तशा सूचना संचालकांना देऊ नये याचे नवल वाटते. किंवा दिल्या असतील तर संचालकांनी त्या सूचनांचा आदर करू नये याचे नवल वाटते. शेवटच्या क्षणापर्यंत सभापतीपदासाठी भाजपतर्फे काशिफ जमा कुरेशी व लायकराम भेंडारकर यांची दावेदारी राहावी. अंतिम क्षणी भेंडारकर यांनी माघार घ्यावी हे कशाचे द्योतक आहे. याला समन्वयाचा अभाव म्हणतात.
नेतृत्वाची कार्यकर्त्यांवरील पकड होतेय सैल
माजी सभापती व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते काशिफ जमा कुरेशी यांनी तर भाजपवर गंभीर आरोप केला. ते म्हणाले भाजपमध्ये अल्पसंख्याकांना स्थान नाही. एकच व्यक्ती अनेक पदे, सकुटुंब राजकारणात, म्हातारपण येईस्तोवर पदाची लालसा ही सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद आहे. भाजप कार्यकर्त्यांना एकजुटीने ठेवू शकली नाही. कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत. कार्यकर्ते पक्षावर हावी होत आहेत. नेतृत्वाची कार्यकर्त्यांवरील पकड सैल झाली आहे. कृउबास निवडणुकीत भाजपच्या पराभवाची नेमकी हीच कारणे आहेत.