मतदार यादी अपडेटमध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:19 AM2021-07-03T04:19:07+5:302021-07-03T04:19:07+5:30
अर्जुनी मोरगाव : विधानसभा मतदार यादी अपडेट ठेवण्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र नागपूर विभागात अव्वल आहे. या मतदारयादीत नावाचा ...
अर्जुनी मोरगाव : विधानसभा मतदार यादी अपडेट ठेवण्यात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र नागपूर विभागात अव्वल आहे. या मतदारयादीत नावाचा समावेश असलेला व छायाचित्र नसलेला एकही मतदार नाही. शंभर टक्के मतदारांना ओळ्खपत्राचे वाटप करण्यात आले आहे. मतदार याद्या अपडेट करणारा ६३ अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र प्रथम ठरला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत नावासमोर छायाचित्र असणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेक विधानसभा मतदारसंघात मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केले नाही. अशा मतदारांची नावे ५ जुलै नंतर मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात मात्र अशी स्थिती नाही. विधानसभा क्षेत्र प्रशासनाने मतदार यादी अपडेट ठेवण्याच्या कामात सातत्य ठेवले. दरम्यान मतदार यादीत पूर्णतः तांत्रिक चुका दुरुस्त केल्या. रेसिड्युअलचे काम १०० टक्के पूर्ण केले. समांतर फोटो व नोंदीचे काम निकाली काढून पूर्णतः अद्ययावत करण्यात आले. जानेवारीत सुरु झालेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमापासून चमूने सातत्याने उत्कृष्ट काम केले. राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली १०० टक्के काम पूर्ण केले. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली.
......
विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण मतदारांचे छायाचित्र जमा केले. यात बीएलओ व तलाठी यांचे सहकार्य घेतले. त्यामुळेच मतदारसंघातील एकाही मतदाराचे नाव छायाचित्राविना नाही. यात मतदार नोंदणी अधिकारी शिल्पा सोनाले यांचेसह मतदार नोंदणी अधिकारी उषा चौधरी सडक अर्जुनी, सचिन गोसावी, निवडणूक नायब तहसीलदार सुनील भानारकर,संगणक ऑपरेटर विजय कोकोडे यांचा मोलाचा वाटा आहे.
विनोद मेश्राम, सहायक मतदार नोंदणी अधिकारी
दृष्टिक्षेप
पुरुष मतदार - १,२६,२२५
महिला मतदार - १,२४,२८७
इतर - २
--------
एकूण मतदार - २,५०,५१४