अर्जुनी-मोरगाव तालुक्याला पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:13 PM2018-08-21T22:13:15+5:302018-08-21T22:13:51+5:30
मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे.
खांबी पुलावर बस बंद पडली
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : मागील २४ तासात अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन तास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव, बोड्या, नाले तुडूंब भरुन वाहत आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. मंगळवारी (दि.२१) सकाळी खांबी नाल्यावर अचानक बस बंद पडली होती, मात्र गावकऱ्यांच्या सहकार्याने सुखरुप बाहेर काढल्याने अनर्थ टळला.
सोमवारी (दि.२०) दुपारी अचानक मेघ दाटून आले. रिपरिप पावसाला सुरुवात झाली. मात्र दुपारी पाऊसाचा जोर वाढला. सुमारे तीन तास पावसाने चांगलेच झोडपले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ११७ व सडक-अर्जुनी तालुक्यात ९२.३३ मि.मी पावसाची नोंद झाली. सर्वत्र पाणीच पाणी दृष्टीस येत होते. मात्र रात्रभर रिपरिप सुरुच होती. खांबी नाल्याच्या पुलावर पाणी असल्याने खांबी-बोंडगावदेवी मार्ग बंद होता. शाळकरी विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. खामखुरा-महागाव व बोरी-मांडोखाल हे रस्ते अजूनही बंदच आहेत. सोमवारी सायंकाळपासून इटखेडा-महागाव, मोरगाव-निलज व खैरी-गोठणगाव मार्गावरची वाहतूक बंद होती. ती मंगळवारी सकाळी सुरु झाली.
अर्जुनी-मोरगाव येथील अनेक प्रभागात अजूनही पाणी साचलेले आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार घरे पूर्णत: पडली तर १६६ घरे अंशत: व ८ गोठ्यांना नुकसान पोहचले आहे. एकूण नुुकसान १० लाखाचे वर झाले आहे. मालकनपूर येथील हेमराज पाडूरंग मेश्राम यांच्या घराजवळ असलेली सार्वजनिक विहिर खचली आहे.
त्यामुळे मोठा खड्डा पडला असून याठिकाणी धोक्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रतापगड, महागाव व इटखेडा रस्त्यावरील पुलावर पाणी असल्यामुळे सोमवारी रात्री वाहतूक बंद होती. त्यामुळे महाराज्य राज्य परिवहन महामंडळाच्या बस अर्जुनी-मोरगाव येथील बसस्थानकावरच अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
अन् बस पुलावर बंद पडली
मंगळवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताचे दरम्यान साकोली-अर्जुनी मोरगाव मार्गे खांबी ही बस खांबी पुलावर आली. पुलावर काही प्रमाणात पाणी होते. चालकाने पुलावर बस काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक तांत्रिक बिघाड आल्याने ती पुलावरच बंद पडली. पुराचे पाणी वाढत होते. पावसाची रिपरिप सुरुच होती. उपस्थितांनी खांबीचे सरपंच प्रकाश शिवणकर यांना भ्रमणध्वनीवर सूचना दिली. त्यांनी लगेच ट्रॅक्टर आणला. ट्रॅक्टरला दोरखंड बांधून बसला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. बसमध्ये एकही प्रवाशी नव्हता. खांबी येथील गावकºयांच्या सहकार्यामुळे अनर्थ टळला.