अर्जुनीचा किशोर काळबांधे जिल्ह्यात प्रथम

By admin | Published: May 26, 2016 12:39 AM2016-05-26T00:39:54+5:302016-05-26T00:39:54+5:30

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ८६.५२ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

Arjuni's Kishor Kalabandhi first in the district | अर्जुनीचा किशोर काळबांधे जिल्ह्यात प्रथम

अर्जुनीचा किशोर काळबांधे जिल्ह्यात प्रथम

Next

गोंदिया : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील ८६.५२ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयाचा किशोर काळबांधे याने जिल्ह्यात सर्वाधिक ९३.६९ टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. तसेच गुणानुक्रमे दुसरे व तिसरे स्थान गोंदिया एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित डी.बी. सायन्स कॉलेजचे विद्यार्थी भाग्यश्री बिसेन (९३.५४ टक्के) आणि आकाश कोतवाल (९२.९२ टक्के) यांनी पटकावले.
यंदाच्या बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील २० हजार ६०२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र प्रत्यक्षात २० हजार ५८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ८१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात नागपूर विभागीय मंडळात गोंदिया जिल्ह्याचे स्थान यावर्षी तिसऱ्या स्थानावर घसरले आहे. बारावीच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक १० हजार २०१ विद्यार्थी कला शाखेचे होते. त्यापैकी ८३०९ विद्यार्थी (८१.४५ टक्के) उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेतून ९०७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८३६३ (९२.१३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तसेच वाणिज्य शाखेतून ८६४ पैकी ७७४ (८९.५८ टक्के) तर व्होकेशनल शाखेतून परीक्षा देणाऱ्या ४४२ पैकी ३६४ (८२.३५) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षीही मुलींनी बाजी मारत मुलांपेक्षा आम्ही सरस आहोत, हे सिद्ध केले. परीक्षा देणाऱ्या १० हजार ७४ मुलांपैकी ८५५५ मुले उत्तीर्ण झाली आहेत. तर १० हजार ५१४ मुलींपैकी ९२५५ मुलींना यश मिळविले आहे.
डी.बी.सायन्स कॉलेजची भाग्यश्री बिसेन हिने ९३.५४ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय तर याच महाविद्यालयाचा आकाश कोतवाल याने ९२.९२ गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले आहे.
विशेष म्हणजे यावेळी १०० टक्के निकाल देणाऱ्या शाळांची संख्याही कमी झाली आहे.
केवळ १३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून त्यात ग्रामीण भागातील शाळा जास्त आहेत. तिरोडा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा, आमगाव, देवरी तालुक्यांत गुणवंतांची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी या तालुक्यात आढळले नाहीत. (जिल्हा प्रतिनिधी)

गरिबीतून मिळविले किशोरने यश
अर्जुनी-मोरगाव : बारावी विज्ञान शाखेतून सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी किशोर ओंकार काळबांधे याने गरीब परिस्थितीतून यश मिळवत जिल्ह्यात प्रथम स्थान पटकावले आहे. त्याला पुढे संगणक अथवा केमिकल इंजिनिअर व्हायचंय, अशी प्रतिक्रिया त्याने लोकमतशी बोलताना दिली.
तीन किमी अंतरावरील ताडगाव येथून किशोर सायकलने शाळेत येत होता. त्याचे वडील मिळेल त्या ठिकाणी इलेक्ट्रीक फिटींगची खासगी कामे करतात. आई गृहिणी आहे. निकाल कळताच अभिनंदनाचा वर्षाव करण्यासाठी त्याच्या घरी येणाऱ्यांची रेलचेल सुरू होती. मात्र आईला मुलाच्या यशाची यत्किंचितही कल्पना नव्हती. त्या दिवसभर रोजगार हमीच्या कामावर होत्या. त्याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. सहावीपासून तो सरस्वती विद्यालयाचा विद्यार्थी आहे. दहावीत त्याने ९३.६० टक्के गुण मिळविले होते. शिकवणी वर्ग नसताना केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून त्याने सुयश संपादन केले. शाळेतील शिस्त, संस्कार, शिक्षण व मार्गदर्शनाचे हे फलित आहे. कठोर मेहनत, जिद्द हे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांने अंगिकारावे असे तो म्हणाला.

Web Title: Arjuni's Kishor Kalabandhi first in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.