परिसरातील धान पिकावर लष्करी अळीचा प्रकोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 04:55 PM2024-10-05T16:55:50+5:302024-10-05T17:08:29+5:30
अळीच्या प्रभावामुळे धान सपाचट : परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावणार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपुरबांध : यावर्षी उत्तम पाऊस पडला आणि शेतकरी समाधानकारक पीक हातात येईल, हा विचार करून समाधान व्यक्त करीत होता. परंतु, निसर्गाच्या अवकृपेने हाता-तोंडाशी आलेल्या धानाला मुकण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होईल, या चिंतेत शेतकरी अडकला आहे.
१ व १० सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाघनदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे शिरपूर जलाशयाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले. पुरामुळे नदीकाठालगतचे धानपीक बुडाले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे नुकसान झाले. परंतु, काही प्रमाणात धान पीक हातात येईल असे वाटत असताना या पूरग्रस्त भागातील धान पिकावर लष्करी अळीने अतिक्रमण केले. शिरपूर बांध व पदमपूर येथील शेतकऱ्यांच्या धानपिकावर हल्ला चढविल्याने पूर्ण पीक हातून गेले असून, लष्करी अळीला नियंत्रणात आणण्याकरिता परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने ड्रोनच्या साह्याने औषधांची फवारणी करीत आहेत.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून लष्करी अळीला आटोक्यात आणण्याकरिता कोणत्या औषधांची फवारणी करावी, त्याचबरोबर नियंत्रणाकरिता उपाय सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी एल. एम. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी के. एम. बोरकर, पर्यवेक्षक एम. एम. जमदाड व कृषी सहायक एम. टी. कोल्हे उपस्थित होते.
"लष्करी अळीच्या नियंत्रणाकरिता शेतातील बांध स्वच्छ ठेवावे, धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवावे. पिकावरून दोरीच्या साहायाने लष्करी अळ्या पाडाव्यात व डायक्लोरोव्हॉस ७५ पाण्यात मिसळून फवारणी करावी."
- एल. एम. राजपूत, तालुका कृषी अधिकारी