परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणण्याची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 05:00 AM2020-04-26T05:00:00+5:302020-04-26T05:00:01+5:30
परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२४) आढावा घेताना अधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२४) आढावा घेताना अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाबाबत गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नेते यांनी शुक्रवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजा दयानिधी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, देवरीचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, भाजयुमोचे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे उपस्थित होते. यावेळी खासदार नेते यांनी कोरोना परिस्थितीबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी माहिती देताना, परराज्य व बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. लक्षणे आढळलेल्या नागरिकांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच बाहेरील नागरिकांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सांगीतले. तसेच रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांना रेशनचा पुरवठा करण्यात येत आहे. रेशनकार्ड धारकांना शासनातर्फे मोफत धान्य वाटप सुरु आहे. ९२५ नागरिक क्वारंटाईनमध्ये असून ५५ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठविल्याचेही सांगीतले. यावेळी अंजनकर यांनी सालेकसा तालुक्यातील ग्राम बोगाटोला येथे १५ मुस्लीम कुटुंबाना धान्य मिळत नसल्याची बाब लक्षात आणून दिली. यावर खासदार नेते यांनी त्या कुटुंबाना त्वरीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी त्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येईल असे सांगितले. ‘लॉकडाऊन’बाबत माहिती विचारली असता पोलीस अधीक्षक शिंदे यांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘लॉकडाऊन’ व्यवस्थित सुरु असून विनाकारण फिरणाºया वाहनधारकांवर कारवाई केली जात असल्याचे सांगितले.