रानटी पशूंचा बंदोबस्त करा

By admin | Published: October 6, 2016 01:05 AM2016-10-06T01:05:03+5:302016-10-06T01:05:03+5:30

तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली.

Arrange wild beasts | रानटी पशूंचा बंदोबस्त करा

रानटी पशूंचा बंदोबस्त करा

Next

वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवेदन : बरबसपुरा येथील शेतकरी त्रस्त
काचेवानी : तिरोडा तालुक्याच्या बरबसपुरा (काचेवानी) क्षेत्रात रानडुकरांनी धानपिकांची नासाडी केली. माकडांमुळे घरांची व भाजीपाला पिकांची नासाडी होत असून यावर वन विभागाने उपाययोजना करावी, याकरिता सरपंच ममता लिचडे यांनी शेतकऱ्यांसह जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या नेतृत्वात तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन दिले.
बरबसपुरा येथील शेतकरी रानडुकरांनी केलेल्या धानपिकांच्या नासाडीने त्रासले आहेत. नुकसान भरपाई दावे करताना वनविभागाद्वारे त्रासदायी व जाचक अटी लादल्या जातात. यावर चर्चा करण्याकरिता व वन्यप्राण्यांची समस्या संबंधात जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांच्या उपस्थितीत सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांची भेट घेतली व निवेदन दिले.
दिवसेंदिवस रानडुकरांची व माकडांची समस्या वाढत चालली असून आहे. ही बाब वनविभागाने गांभीर्याने घेवून रोकथाम करण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याला कवलेवाडा क्षेत्राचे जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी दुजोरा दिला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी रानडुकराला मारण्याची परवानगी मागितल्यास आपण देवू शकतो, मात्र मारायचे कसे ते आपण ठरवावे आणि कायदा पालनाची काळजी घ्यावी, असे सांगितले.
त्रासदायी समस्यांमुळे नुकसान भरपाईचे दावे करणे अनेक शेतकरी टाळतात. काही शेतकरी दावे सादर करतात, तेव्हा कर्मचारी रूपयांची मागणी करतात. स्वाक्षरीसाठी शेतकऱ्यांना त्रास देतात, अशी समस्या जि.प. सदस्य डोंगरे व सरपंच ममता लिचडे यांच्यासह शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसमक्ष मांडली. यावर कृषी विभागाला वगळण्याचे आदेश वन विभागाने दिले असून नुकसान भरपाई दाव्यांना विलंब होणार नाही, हे यामागील मुख्य उद्देश्य असल्याचेही राऊंड आॅफीसर व्ही.सी. मेश्राम यांनी सांगितले.
वनविभागाने रानडुक्कर आणि माकडांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या नाही तर शेतकऱ्यांचे शेतात व नागरिकांचे घरी राहणे भविष्यात कठिण होईल, असे जि.प. सदस्य डोंगरे यांनी यावेळी सांगितले. सद्यस्थितीत शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत असल्याचे सरपंच ममता लिचडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सांगितले.
वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम आणि क्षेत्रीय वनाधिकारी व्ही.सी. मेश्राम यांनी उपस्थितांना सांगीतले की, आमच्याकडे वन आणि प्राणी यांच्या सरंक्षणाची जवाबदारी असल्याने आम्हाला सर्वदूर परिस्थिती माहिती असली तरी काही करू शकत नाही. याकरिता राजकीय लोकसेवकांनी या समस्या शासनासमक्ष ठेवाव्या. त्यावर शासन उपाययोजना ठरवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिष्टमंडळात जि.प. सदस्य मनोज डोंगरे, सरपंच ममता लिचडे, अशोक लिचडे, माणिकराम कटरे, बाळू पारधी, नेतराम माने, श्याम नागपुरे, उमाशंकर लिल्हारे व बरबसपुरा येथील शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)

अनुसूची ३ मधून वगळणे गरजेचे
रानडुकर आणि माकड अनुसूची-३ मध्ये मोडतात. रानडुकरांची उत्पत्ती फार मोठी असल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. माणसापेक्षा हिंसक पशूंची किंमत अधिक का? असा प्रश्न मनोज डोंगरे आणि ममता लिचडे यांनी उपस्थित केला. यावर वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस. कदम यांनी सांगीतले की, वन्यप्राणी हे अनुसूची ३ मध्ये सरंक्षित असल्याने त्यांना मारण्याची परवानगी नाही. या प्राण्यांना अनुसूची तीनमधून काढण्यात आले आणि सरसकट मारण्याची परवानगी देण्यात आली तर हे शक्य आहे. परंतु हे अधिकार शासनाला असल्याने लोकप्रतिधिंनी शासनाच्या निदर्शनात आणून देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत शासनाच्या व विभागाच्या बंधनात असल्याने धानपीक व इतर नासाडीच्या नुकसान भरपाई संबंधात दावे नियमानुसार मंजुरीसाठी पाठविले जातील. अधिक त्रास होणार नाही, असे सांगून त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

बंदोबस्तासाठी तीन उपाय
रानडुकरांच्या बंदोबस्ताकरिता बाजारात राऊंड बॉक्स उपलब्ध आहेत. हे यंत्रामुळे शेतात वनराजासह अनेक ध्वनी निर्माण करीत असल्याने रानडुकरे त्या परिसरात येत नाहीत. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असल्याचे दिसून येत नाही. याची किंमत दोन हजारापासून १८ हजारापर्यंत आहे. गरजू शेतकऱ्यांना साऊंड मेमरीमध्ये वनविभागातून आवाज उपलब्ध करून देता येईल, असे वनपरिक्षेत्राधिकारी व्ही.एस.कदम यांनी सांगितले. दुसरा उपाय म्हणून त्यांनी सांगितले की, लाल मिरची लावावी. त्यात रॉकेल ओतून शेतात जाळल्यास त्याची तिरवट धूर परिसरात पसरेल. रानडुकर ही खालमानी असल्याने धुरामुळे शेतात येणार नाही. परंतु हे प्रभावशील होईलच, असे म्हणता येत नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: Arrange wild beasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.