वृद्धाला करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत:च लखपती होणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 01:05 PM2023-11-11T13:05:23+5:302023-11-11T13:06:03+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : गुप्तधन काढून देण्याच्या नावावर केली होती सात लाखांनी फसवणूक

Arrested two people who become millionaires themselves after showing the dream of becoming a millionaire to an old man | वृद्धाला करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत:च लखपती होणाऱ्या दोघांना अटक

वृद्धाला करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत:च लखपती होणाऱ्या दोघांना अटक

गोंदिया : वृद्धाला गुप्तधनातून करोडपती होण्याचे स्वप्न दाखवून स्वत: लखपती होण्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या मांत्रिकासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ८ नोव्हेंबर रोजी अटक केली आहे. गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य (वय ४५) व गुड्डू गोकुल घेलोद (२८, दोन्ही रा. वारंगा गाव, गोसावीनगर, बुट्टीबोरी, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

देवरी तालुक्याच्या खुर्शीपार येथील ग्यानिराम सादाराम उके (८०) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने गुड्याचा त्रास नष्ट होणारी औषधी कुठे मिळेल, असे नातेवाइकांना विचारले असता नातेवाइकांनी या मांत्रिकाचा नंबर दिला. नातेवाइकांच्या माध्यमातून गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य या मांत्रिकासोबत झालेली ओळख चांगलीच झाली. त्याच्याकडून ग्यानिराम उके यांनी गुडघादुखीची औषधी घेतली. त्यात त्यांना आरामही मिळाला. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपी गोकुल घागरू घेलोद ऊर्फ गोकुल वैद्य याने आपला व्हिजिटिंग कार्डसुद्धा त्यांना दिले होते. औषधी घेण्यासाठी गेलेल्या ग्यानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे. ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो असे त्याने सांगत तू करोडपती होशील असे आमिष दिले. त्याच्यावर विश्वास ठेवत खुर्शीपार येथील ग्यानिराम सदाराम उके (८०) यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली.

आरोपींनी त्यांच्या जवळून ७ लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात दोन आरोपींवर भादंविच्या कलम ४२०, ३४ सहकलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चारण करण्याचे अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे करीत आहेत.

गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढल्या २८ मूर्ती व २ झाकण

गुप्तधन जमिनीतून काढण्याच्या नावावर त्यांच्या घरात खड्डा खोदून बनवाबनवी करून गुप्तधन काढण्याच्या नावावर त्यांच्या घरी खोदलेल्या खड्ड्यात एका तांब्याच्या लोट्यात १५ पितळेच्या लहान मूर्ती, एक बालकृष्णाची मूर्ती, एका तांब्याच्या हंड्यात गणेशच्या ५ मूर्ती, देवीच्या ७ मूर्ती, दोन पितळेचे झाकण काढण्यात आले. आरोपींनी नजर चुकवून ते साहित्य जमिनीत गाडून त्यांना जमिनीतून काढत असल्याची बनवाबनवी करण्यात आली.

पालघर येथून आरोपींना अटक

तांत्रिक विश्लेषणावरून गुन्ह्यातील दोन्ही आरोपी हे क्रांतीनगर जव्हार (जि. पालघर) येथे असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पालघर येथून दोन्ही आरोपींना स्थानिक पोलिसांचे मदतीने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, पोलिस हवालदार लुटे, चेतन पटले, रियाज शेख, पोलिस शिपाई संतोष केदार, अजय रहांगडाले, सायबर सेलचे पोलिस हवालदार धनंजय शेंडे, संजय मारवाडे यांनी केली आहे.

लुटलेल्या पैशांतून कर्ज भागविले

दोन्ही आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्या गुन्ह्यात तक्रारदार यांना फसवणूक केलेल्या ७ लाख रुपयांच्या रकमेबाबत विचारणा केली असता त्यांनी लोकांकडून व्याजाने पैसे घेतल्याने त्यांच्यावर असलेले कर्ज भागविले असल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना पोलिस ठाणे देवरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

Web Title: Arrested two people who become millionaires themselves after showing the dream of becoming a millionaire to an old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.