अरततोंडीची बोअरवेल परसटोलाने पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 01:42 AM2017-05-24T01:42:35+5:302017-05-24T01:42:35+5:30
चौदाव्या वित्त आयोगाच्या फंडामधून परसटोला, धमदीटोला व अरततोंडी या तिन्ही गावांमध्ये प्रत्येकी एकेक बोअरवेलचे खोदकाम करणे अनिवार्य होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : चौदाव्या वित्त आयोगाच्या फंडामधून परसटोला, धमदीटोला व अरततोंडी या तिन्ही गावांमध्ये प्रत्येकी एकेक बोअरवेलचे खोदकाम करणे अनिवार्य होते. नमूद ठरावानुसार परसटोला व धमदीटोला या दोन्ही गावांत खोदकाम करण्यात आले. परंतु अरततोंडी येथे बोअरवेल मशीन येवूनही ग्रामस्थांना कसलीही विचारपूस न करता परसटोला येथे नेवून खोदकाम करण्यात आले.
परसटोला गावाचे नाव ठरावामध्ये नमूद नसतानासुद्धा तेथे बोअरवेल खोदकाम करण्यात आले. हे काम चुकीचे आहे, असे कळल्यानंतर काही वेळाने अरततोंडी ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची सरपंच, सचिव व अरततोंडी येथील सदस्य यांना विचारणा केली असता याबाबद आम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर मिळाले.
शासनाच्या निकषाप्रमाणे ठरावामध्ये नमूद असल्याप्रमाणे काम करणे अनिवार्य आहे. प्रोसेडिंग रजिस्टरमध्ये अरततोंडी येथे नमूद केलेल्या ठिकाणी बोअरवेल खोदकाम करणे अपेक्षीत होते. परंतु तसे झाले नाही. १ मे रोजी घेतलेली सभा तहकुब झाली ती तहकुब सभा १६ मे रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात आली.
अरततोंडी ग्रामवासीयांनी या कामाची दखल घेण्यासाठी १२ मे रोजी ग्रामपंचायतला अर्ज दिला. त्यामध्ये सभेच्या विषयसूचीचे वाचन झाले व शासकीय परिपत्रकाचे वाचन झाल्यानंतर भावेश खुशाल डोंगरे यांनी त्यांच्या घरासमोर झालेल्या बोअरवेलच्या कामाचे अर्ज दिले. तो विषय ग्रामसभेच्या सभेमध्ये कोणतीही सूचना मांडण्याची इच्छा असल्यास सभेच्या कमीत कमी दोन दिवसा आधी अर्ज सादर करणे आवश्यक आहे, असे प्रसिद्ध केलेल्या सभेच्या नोटीसवर लिहिले आहे. पण सभेच्या शेवटी अर्ज स्वीकारुन तो विषय सभेमध्ये चर्चेत आणून हात वर करुन पारित करण्यात आला.
ग्रामपंचायत नियमानुसार तहकुब झालेल्या सभेमध्ये दुसरे विषय घेता येत नाही आणि त्यांना मंजुरीसुद्धा देत येत नाही.
तरी या झालेल्या चुकीच्या कामाची चौकशी करुन आपल्या मनमर्जीने काम करणाऱ्यांवर कारवाई करावी व ठरावामध्ये नाव नसूनसुद्धा तेथे बोअरवेल स्वमर्जीने तयार केले, त्याचे पैसे त्यांनीच भरावे. ते पैसे ग्रामपंचायतने दिले तर ग्रामपंचायतला जबाबदार धरुन दोषी ठरविण्यात येईल.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा अरततोंडी येथील संपूर्ण गावकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे.