रस्त्यालगत असलेले कृत्रिम पाणवठे प्राण्यांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:21+5:302021-05-14T04:28:21+5:30
केशोरी : उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगावकडून वन्य प्राण्यांसाठी गोठणगाव ते नवेगावबांध ...
केशोरी : उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती होऊ नये म्हणून वनपरिक्षेत्र कार्यालय गोठणगावकडून वन्य प्राण्यांसाठी गोठणगाव ते नवेगावबांध या रस्त्याला लागून कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. हा रस्ता जिल्ह्याचा प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्याने रात्रंदिवस वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीमुळे रस्त्याला लागून असलेल्या पाणवठ्यांवर पाणी पिण्यासाठी येणारे प्राणी घाबरुन पळून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील पाणवठे जंगली प्राण्यांसाठी धोकादायक ठरू पाहात आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव ते नवेगावबांध या रस्त्याकडील घनदाट जंगल असून या जंगलात सतत हरिण, चितळ, रानडुकर, मोर, बिबट, अस्वल या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंगलातील पाण्याचे स्त्रोत कोरडे होत असतात. वन्यप्राणी परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करु नये म्हणून वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार केली आहेत. परंतु हे पाणवठे गोठणगाव ते नवेगावबांध या महत्त्वाच्या जिल्हा मार्गालगत आहेत. या मार्गाने रात्रंदिवस वाहने धावत असल्यामुळे पाणवठ्यावर येणारे वन्यप्राणी घाबरुन पळून जातात. पाण्याविना सैरावैरा पळत आहेत. काही प्राणी मानवी वस्तीत शिरकाव करीत असल्याचे सांगण्यात येते. रस्त्यालगत असलेल्या पाणवठ्याचा शिकारी गैरफायदा घेऊन प्राण्यांची शिकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी वनविभागाने रस्त्याला सोडून कृत्रिम पाणवठे तयार करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा या रस्त्याने वन्य प्राण्यांच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. याकडे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे अगत्याचे वाटते, रस्त्यालगत असलेले पाणवठे जंगली प्राण्यांसाठी धोकादायक ठरत आहेत.
.........
शिकारीच्या घटनांमध्ये वाढ
वन्यजीव विभागाने वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करताना सर्वच बाबींचा अभ्यास केला नाही. रस्त्यालगत असलेल्या पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये सुध्दा वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दुसरीकडे पाणवठे तयार करण्याची गरज आहे.