गंगाबाईतील बालकांना मिळणार कृत्रिम श्वास
By admin | Published: January 5, 2016 02:14 AM2016-01-05T02:14:04+5:302016-01-05T02:14:04+5:30
नवजात बालकांसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात अतिदक्षता कक्ष आहे. या ठिकाणी बालकांवर उपचार केला जातो. परंतु
नरेश रहिले ल्ल गोंदिया
नवजात बालकांसाठी बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात अतिदक्षता कक्ष आहे. या ठिकाणी बालकांवर उपचार केला जातो. परंतु अतिगंभीर असलेल्या बालकांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची वेळ आल्यास नागपूरला पाठवावे लागत होते. यातच अनेक बालकांना जीव गमवावा लागत होता. परंतू जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारामुळे आता या अतिगंभीर बालकांना गंगाबाई रुग्णालयातच व्हेंटीलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छवासाची सोय केली जात आहे.
बालकांसाठी असणाऱ्या व्हेंटीलेटरची सोय विदर्भात कोणत्याही जिल्हास्तरावरील रुग्णालयात नाही. जन्माला आलेले नवजात बालक अपरिपक्व नसेल किंवा त्याच्यावर उपचाराची गरज असेल तर त्याला अतिदक्षता कक्षात ठेवून उपचार केला जातो. परंतु अनेक वेळा बालकांची प्रकृती अधिक गंभीर झाल्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्याची गरज असते. अशा बालकांना व्हेंटीलेटरवर ठेवल्यास ते बाळ कदाचित वाचू शकते.
आतापर्यंत अशा बालकांना नागपूरला रेफर केले जात होते. गंगाबाईत आलेले रूग्ण हे गरिब असतात. त्या बालकांचे पालक नागपूरला बाळाला उपचारासाठी नेण्याचा खर्च झेपत नाही म्हणून डॉक्टरांना विनवणी करीत होते. अश्या पालकांना एक आशेचा किरण मिळणार आहे. गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आहे. आता गंगाबाईत कृत्रिम श्वासोच्छवासाची सोय करण्यात येणार असल्याने बालमृत्यूूचे प्रमाणही घटणार आहे.
बालरोगतज्ज्ञ मिळाले
४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात वर्षभरात सात हजार महिलांची प्रसूती केली जाते. जन्माला आलेले बहुतांश बालक कमजोर असतात. काही कुपोषित असतात तर काहींना विविध प्रकारचे आजार असतात. त्या बाळांची काळजी घेण्यासाठी गंगाबाईत डॉ.संजीव दोडके व डॉ. अमरीश मोहबे हे दोनच बालरोगतज्ज्ञ होते. परंतु आता डॉ.मयुरी ठाकूर व डॉ.सागर सानारे हे दोन डॉक्टर रूजू झाले आहेत. आणखी दोन डॉक्टर येणार असल्याची माहिती अधिक्षक डॉ.दोडके यांनी दिली.
विकास कामांसाठी ५० लाखांची तरतूद
४बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील किरकोळ कामे करण्यासाठी ३८ लाख तर नवजात बालकांच्या व्हेंटीलेटरसाठी १२ लाख रूपये जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करून दिले. ही रक्कम लवकरच गंगाबाई स्त्री रूग्णालयाला मिळणार आहे.