एकाच ट्रकमध्ये कोंबले तब्बल १२० विद्यार्थी, १० पडले बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 08:05 AM2022-09-26T08:05:47+5:302022-09-26T08:06:19+5:30
मुख्याध्यापक व सहायक शिक्षक निलंबित; मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश.
गोंदिया : क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तब्बल १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबण्यात आले. यामुळे काही विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास त्रास होऊन १० विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत रविवारी अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व सहायक शिक्षकाला निलंबित केले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथे आश्रमशाळांच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले होते. यासाठी मजितपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या १२० विद्यार्थ्यांना शनिवारी एकाच ट्रकमधून नेण्यात आले. दोन-तीन वाहनांची गरज असताना मुख्याध्यापकांनी सर्व १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमधून नेण्यास सांगितले.
रात्री ९ वाजताच्या सुमारास विद्यार्थी त्याच ट्रकमधून परत येत असताना अनेक विद्यार्थ्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. १० विद्यार्थी बेशुद्ध पडले. ट्रकमध्ये असलेल्या शिक्षकाने चालकाला गाडी जवळच्या एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यास सांगितले. तेथे बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र शिवाणी चुलपार, पूनम वट्टी, भुनेश्वरी उईके या तीन विद्यार्थिनींची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तिन्ही विद्यार्थिनींची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. मुख्याध्यापक एस. के. थुलकर व सहायक शिक्षक एन. टी. लिल्हारे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
पालकमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
या घटनेची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले.
पैसे वाचविण्यासाठी खटाटोप
मुख्याध्यापकाने प्रवास भाड्याचे पैसे वाचविण्यासाठी १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमधून ७० किमीच्या प्रवासाला नेऊन एकाप्रकारे त्यांच्या जिवाशी खेळच केला. त्यामुळे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर पालकांनी संताप व्यक्त केला. आ. विजय रहांगडाले यांनी आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
विद्यार्थ्यांची बेजबाबदारपणे वाहतूक, जबाबदारीचे योग्यरितीने पालन न करणे या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मुख्याध्यापक आणि जबाबदार शिक्षकावर पुढील कारवाई केली जाईल.
विकास राचेलवार,
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी.