विद्येच्या मंदिर परिसरातच तब्बल ७८१ पानटपऱ्या; तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 15:21 IST2024-10-09T15:19:24+5:302024-10-09T15:21:06+5:30
सर्वेक्षणानंतर बाब आली उघडकीस : दंडात्मक व फौजदारी कारवाई होणार

As many as 781 Pan tapri in school area; Action against the sellers of tobacco products
नरेश रहिले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शालेय मुलांना खर्रा, गुटखा, तंबाखूचे व्यसन जडले आहे. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शाळेच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात असल्याने तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात सुरू केली आहे. जिल्ह्यातील शाळांच्या १०० मीटर व २०० मीटर परिसरात किती पानटपऱ्या आहेत याचे सर्वेक्षण पोलिस विभागाने केल्यावर शाळा परिसरातच तब्बल ७८१ पानटपन्या असल्याची बाब पुढे आली आहे.
महिनाभरापासून जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शालेय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होऊ नये यासाठी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे.
शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात गुटखा, तंबाखू, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत सर्वत्रच गुटखा खुलेआम विक्री केला जात आहे.
शाळांच्या १०० मीटर परिसरात ४१७, तर २०० मीटर परिसरात ३६४ पानटपऱ्या असल्याची बाब पुढे आली आहे. आता या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिस विभागाने सुरू केली आहे.
आता दंडात्मक कारवाई, न ऐकल्यास फौजदारी
शाळा-महाविद्यालयाच्या २०० मीटरच्या परिसरात तंबाखू, गुटखा, सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ कोणी विक्री करीत असेल, तर त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पालक, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांची आहे. थेट विक्रेत्याला बोलण्याऐवजी पोलिसांची मदत घेऊन कारवाई केल्यास भविष्यात मुले व्यसनी होणार नाहीत. यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. सुरुवातीला २०० रुपये दंड करून सोडले जात आहे. दंड केल्यानंतरही विक्री सुरूच ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया
जिल्हा पोलिसांची १२६ पानटपरी चालकांवर कारवाई
गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांतर्गत १२६ कारवाया करण्यात आल्या आहेत. दररोज कारवाया करणे सुरूच आहे. यात सर्वाधिक कारवाया गोंदिया शहर पोलिसांनी केल्या आहेत.