सत्तेतून बाहेर पडल्यामुळे त्यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसते, अब्दुल सत्तारांचा नाना पटोलेंना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 06:29 PM2022-12-09T18:29:33+5:302022-12-09T18:36:02+5:30
धानाला बोनस, परतीच्या पावसाच्या नुकसानीचा निर्णय अधिवेशनात; महाराष्ट्र धमक्यांना घाबरत नाही - अब्दुल सत्तार
गोंदिया : धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाला प्रति क्विंटल बोनस आणि परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईबाबत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्यात येणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गुरुवारी (दि. ८) गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना बोलताना सत्तेतून बाहेर पडल्यावर नाना पटोले यांना महाराष्ट्र तुटत असल्याचे दिसत असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला. केंद्राच्या माध्यमातून भाजपवाले महाराष्ट्र तोडताय, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले असून अब्दुल सत्तार यांनी गोंदियात त्यावरून पटोलेंचा समाचार घेतला.
संजय राऊत यांना टोला
राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सध्या दोन कमिटी काम करीत आहे. एक दिवस बळीराजा ही योजना राज्यभर राबविली जात असल्याने शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या जाणून त्यावर निर्णय घेतले जात असल्याने येणाऱ्या काळात शेतकरी आत्महत्या थांबणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादावरून धमक्या येत असल्याबाबत त्यांना विचारले असता महाराष्ट्र अशा धमक्यांना भीक घालत नसून मराठी माणसाच्या संरक्षणासाठी जो पुढे येईल, त्याच्या पाठीशी महाराष्ट्र राहील, असे म्हणाले. संजय राऊत यांनी महाराष्ट्राबद्दलचे प्रेम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिकवू नये, असे सांगितले.