अशोक वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य धाेक्यात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:33+5:302021-06-22T04:20:33+5:30
तिरोडा : नगरपरिषदेंतर्गत येणाऱ्या अशोक वॉर्डातील वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरातील केरकचऱ्याची नगरपरिषदेकडून ...
तिरोडा : नगरपरिषदेंतर्गत येणाऱ्या अशोक वॉर्डातील वडाच्या झाडाखाली मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरातील केरकचऱ्याची नगरपरिषदेकडून नियमित विल्हेवाट लावली जात नसल्याने मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून यामुळे साथीच्या आजारांची लागण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशोक वाॅर्ड येथील वडाच्या झाडाखाली परिसरातील नागरिक केरकचरा टाकतात. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. मागील महिनाभरापासून या कचऱ्याची उचल करण्यात आली नसल्याने डासांचा प्रादुर्भावसुद्धा वाढला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. अशात यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक नगर परिषदेने याची दखल घेऊन ही समस्या दूर करण्याची मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.